वर्ध्यातील खरांगणा-कारंजा मार्गावरील धाम नदीवरील पूल खचला
1964 साली हा पूल बांधण्यात आला होता. 52 वर्षे जुना हा पूल दगडी पिलरवर जुन्या पद्धतीने बांधलेलं आहे. या मार्गवर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू असते.
वर्धा : खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा, कोंढाळी मार्गावरील धाम नदीवर असलेला पूल खचल्याची घटना समोर आली आहे. मध्यभागातून पूल खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. काल रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पुलावरील वाहने निघून गेल्यानंतर पूल खचल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून तात्काळ मार्किंग करून बॅरिकेट्स लावून वाहतूक थांबवली. पूल राज्य मार्गावर येत असल्याने बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे.
1964 साली हा पूल बांधण्यात आला होता. 52 वर्षे जुना हा पूल दगडी पिलरवर जुन्या पद्धतीने बांधलेलं आहे. या मार्गवर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू असते. मध्यप्रदेशमधून हैद्राबादकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.़ या मार्गामुळे जवळपास 100 किमी लांबीचा प्रवास वाचतो. याशिवाय टोल टॅक्स वाचण्यासाठीदेखील या मार्गाचा उपयोग होते. महाकाली प्रसिद्ध देवस्थान सुद्धा याच मार्गावर आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या समस्येचा सामना येत्या काळात करावा लागणार आहे.