Breaking News LIVE : HSC EXAM UPDATE : 12 वी परीक्षेसंदर्भात उद्या निर्णय, सूत्रांची माहिती

Breaking News LIVE Updates, 31 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 May 2021 10:09 PM
12 वी परीक्षेसंदर्भात उद्या निर्णय, सूत्रांची माहिती

12 वी परीक्षेसंदर्भात उद्या निर्णय घेण्यात येणार आहे. शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल उद्या या संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

HSC EXAM UPDATE : बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार

बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल घोषणा करणार, परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट केली जाणार,  18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे विद्यार्थी, केंद्रांमध्ये नेमलेले शिक्षक, कर्मचारी यांना प्राधान्याने लस दिली जाईल

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्याम लक्ष्मणराव पोशेट्टी यांना 9 लाखांची लाच मगितल्याप्रकरणी अटक

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्याम लक्ष्मणराव पोशेट्टी (वय 44) यांना 9 लाखाची लाच मगितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ठेकेदाराने पूर्ण केलेेेल्या कामाचे बिल देन्यासाठी श्याम लक्ष्मणराव पोशेट्टी आणि त्यांचा सहकारी विशाल अंकुश मिंड यांनी लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले होते..या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर श्याम पोशेट्टी यांनी याच मागण्या सहकार्य केले असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करीत श्याम पोशेट्टी यांना अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार, खासदारांची उद्या शरद पवार यांच्या उपस्थित बैठक

उद्या 3 ते 5 वाजता राष्ट्रवादीचे आमदार, खासदार यांची शरद पवार यांच्या उपस्थित बैठक होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 7 वाजता राष्ट्रवादीचे मंत्री यांची शरद पवार यांच्या सोबत बैठक आहे. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात  बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल. आमदार आणि त्यांच्या मतदार संघातील प्रश्न, मराठा आरक्षण संदर्भात चर्चा, पदोन्नतीच्या विषयावर चर्चा होईल तसेच पक्षाने काय भूमिका घ्यायची यावर चर्चा होईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा, सध्याच्या काळात राज्यात दहावीची परीक्षा घेणं शक्य नाही, राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा, सध्याच्या काळात राज्यात दहावीची परीक्षा घेणं शक्य नाही, राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराने घेतलेला निर्णय योग्यच असल्याचा दावा, उद्या मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी

सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन कायम, आकडेवारी कमी होत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

सातारा जिल्ह्यातील कडक लाॕकडाऊनचे आदेश कायम, आकडेवारी कमी होत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, 8 जूनपर्यंत कडक लाॕकडाऊनचेआदेश, मेडिकलची दुकाने, दवाखाने, अत्यावश्यक सेवेसाठी इंधन इत्यादी वगळता सर्व बंद

अमरावती जिल्ह्यात लॅाकडाऊन शिथील : सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार सर्व प्रकारची दुकाने, शनिवार-रविवार बंद

  • उद्यापासून अमरावती जिल्ह्यातील बाजारपेठ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडण्याचा आदेश...

  • जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  • तर सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवाअंतर्गत असलेली दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहील... शनिवार आणि रविवारी बिगर जीवनावश्यक दुकाने बंद राहतील.


  • हॉटेल, खानावळ, शिवभोजन थाली यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहील.. कोणत्याही परिस्थीतीत ग्राहकास येथे स्वतः जाऊन पार्सल घेता येणार नाही.. जर ग्राहक आढळल्यास आस्थापनेवर कारवाई केली जाईल..


     




  • अमरावती जिल्ह्याच्या सीमावर्ती भागावर पोलिसांनी कोविड 19 चा निघेटीव्ह रिपोर्ट असल्या शिवाय जिल्ह्यात प्रवेश देण्यात येऊ नये..


     




  • मास्क न घालणाऱ्यावर 750 रुपयांचा दंड राहणार



पुण्यात गेल्या 24 तासात केवळ 180 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


पुण्यात गेल्या 24 तासात केवळ 180 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, दिवसभरात एकूण 4439 चाचण्या, तर गेल्या 24 तासात 751 रुग्ण कोरोनामुक्त, पुणे शहरातील 24 तर बाहेरील अशा 33 जणांचा मृत्यू, सध्या पुणे शहरात 6020 अक्टिव्ह रुग्ण

पुण्यातील दुकाने उद्यापासून उघडण्यास परवानगी द्यावी, आदेश न दिल्यास आंदोलनाचा व्यापारी महासंघाचा आंदोलनाचा इशारा

पुण्यातील दुकाने उद्यापासून उघडण्यास परवानगी द्यावी...राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार आम्हाला परवानगी देण्यात यावी...गेले 56 दिवस लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. मात्र काल राज्य सरकारने काढलेल्या नियमानुसार पुणे महापालिका हद्दीतील दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाऊ शकते.आम्हाला सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी. यासाठी आम्ही पुणे महापालिका आयुक्तांना भेटलो आहे. ते उपमुख्यमंत्र्यांशी बोलून सांयकाळपर्यत आदेश काढतील जर सरकारने तसे काही आदेश काढले नाही, तर आम्हाला उग्र पाऊल नाईलाजाने उचलावी लागतील, असा इशारा पुणे व्यापारी महासंघाने दिला आहे.

देशात 'वन नेशन वन प्राईज'प्रमाणे लस विकल्या जाव्यात असा निकाल सुप्रीम कोर्टाकडून येणं अपेक्षित- राजेश टोपे

ग्लोबल टेंडर काढूनही बाहेरील देशातून लस मिळणं अशक्य असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हंटलंय.. त्यामुळं सगळी मदार सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लसींवर आहे.. राज्यात सध्या काही खाजगी रुग्णालय आणि हाॅटेल्समध्ये जास्तीचे पैसे घेवून लसीकरण केल्याची माहिती आहे.. लसीकरणाचा सगळा कार्यक्रम हा केंद्र सरकारकडून चालतो.. त्यामुळे केंद्रानं याची दखल घेतली असल्याचं टोपे यांनी म्हंटलंय.. त्याचबरोबर देशात वन नेशन वन प्राईज प्रमाणे लस विकल्या जाव्यात असा निकाल सुप्रीम कोर्टाकडून येणं अपेक्षित आहे.. दरम्यान ग्लोबल टेंडर काढूनही बाहेरील देशातून लस मिळणं सध्या शक्य नाही त्यामुळं सगळी मदार ही कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीनवरच आहे असं टोपे यांनी म्हंटलंय..

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल

 कोरोना नियमांचे पालन न केल्याने  पिंपरी चिंचवडमधील भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडाऱ्यात नाहून लांडगे स्वतःच बेफाम होत, नृत्य करतानाचे व्हिडीओ समोर आलेत. त्यांच्या मुलीचा विवाहसोहळा 6 जूनला आहे. त्यापूर्वीच्या सोहळ्यात अपवाद वगळता आमदारांसह सगळेच विनामास्क वावरत आहेत तर सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडविला आहे. काल मांडव टहाळ्याचा कार्यक्रम होता. यासाठी वाजंत्री, बैलजोड्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याचे फोटो आणि व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांच्या कार्यक्षेत्रात कोरोना नियमांची ऐशीतैशी झाली

पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात

पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं.  आता मागील अर्धा तासापासून शहरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना आता 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार

राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना आता 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10 टक्केआरक्षणाचा लाभ मिळणार आहे.  त्याबरोबर सरळ सेवा भरतीतही मराठा उमेदवार 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. राज्य सरकारने याबाबत आदेश जारी केला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. राज्यात मराठा आरक्षण लागू असताना मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षणाचा फायदा घेता येत नव्हता, तसा निर्णय सरकारने घेतला होता. आता मात्र मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 च्या चाचणीला सुरुवात, मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील

मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 च्या चाचणीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाचणी हिरवा कंदील दाखवला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.

मुंबईतील विविध भागांत आज मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; मुंबई, ठाणे परिसरात पावसाच्या हलक्या सरी

मुंबई :  मुंबईतील विविध भागात आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  मुंबई, ठाणे आणि पालघर या भागात पावसाच्या सरी बरसण्याचा इशारा देण्यात आला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. पूर्व उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे काही नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 

सेंट्रल विस्टा प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली, प्रकल्पाविरोधात याचिका करणाऱ्यांना एक लाखांचा दंही ठोठावला 

मुंबईतील सायन कोळीवाड्यात कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या, दोघे आरोपी पसार

मुंबईतील सायन कोळी वाडा इथल्या म्हाडा इमारतीमध्ये घुसून दोन जणांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला. याता त्याचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ही घटना घडली. वसंतकुमार देवेंद्र असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. काल रात्री अकरा वाजताच्या दरम्यान तो इमारती खाली असताना दोन जणांनी त्याला गाठलं. दोघांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले आणि तिथून पळ काढला. हे आरोपी इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. जखमी अवस्थेत वसंतकुमारला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी वडाळा पोलीस तपास करत आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाच्या कारवाई, 40 लाखांच्या दारूसह 55 लाखांचा मुद्देमाल जप्त
सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने कणकवली तालुक्यातील तळेरे येथे गोवा बनावटीच्या 40 लाख रुपये किमतीच्या दारूसह टेम्पो मिळून 55 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोव्याहून नाशिक कडे जाणारां टेम्पो या पथकाने तळेरे येथे पहाटे च्या सुमारास ताब्यात घेतला. याप्रकरणी चालकासह दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.

 

स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने तळेरे येथे नाशिक कडे जाणारा आयशर टेम्पोच्या हौद्यात गोवा बनावटीच्या दारूचे 357 बॉक्स सापडले. याची किंमत 40 लाख 25 हजार 880 रुपये असून एकूण 55 लाख २५ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 


वाशिमच्या शेलूमध्ये शेतातील गोठ्याला आग; आगीत शेतकऱ्याच मोठं नुकसान

वाशिम : वाशीम जिल्ह्यातील शेलू खु या गावालगत असलेल्या  शेत शिवारात एका शेतकऱ्यांच्या  शेतातील गोठ्याला  रात्री अचानक आग लागली. या आगीमध्ये  शेतकऱ्यांच्या  गुरांना लागणारा चारा शेती उपयोगी साहित्य आणि गोठा  संपूर्ण जाळून राख झाला.  दरम्यान वाशिमच्या अग्निशमन  पथकाने  आग आटोक्यात  आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत उशिर झाला असल्याने  शेतकऱ्यांच  मोठ आर्थिक नुकसान झालं. नेमकी आग कशाने लागली की, लावली याचा तपास अनसिंग पोलीस करत आहेत. 


 

 
सिंधुदुर्ग : दोडामार्गात सहा हत्तींकडून एक हजार केळींसह माडबागायतीचे नुकसान

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात चार हत्ती आणि दोन पिल्ले असा एकूण सहा हत्तींच्या कळपाकडून केळी आणि नारळाच्या बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या तिलारीतील बागायतीची हत्तींनी एक हजार केळींसह नारळ बागायतीचे मोठं नुकसान केलं आहे. नारळ सोलून खात केळी बागायतही जमीनदोस्त केली आहे. मांगेली गावातही हत्तींनी शेतकऱ्यांच मोठं नुकसान केलं आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे हत्तीकडून शेतकऱ्यांच्या केळी, नारळ बागायतीचे मोठं नुकसान केलं जात असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे दोडामार्ग मध्ये सहा हत्तीचा कळप वनविभाग कशा पध्दतीने रोखणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

पुण्यातही पेट्रोल शंभरी पार

पुण्यातही पेट्रोलने शंभरी पार केली आहे. पेट्रोलचा दर प्रति लिटर 100.15 रुपये आहे. तर डिझेलसाठी प्रति लिटर 90.71 रुपये मोजावे लागत आहेत. 

भिवंडीत दोन गटात जोरदार राडा; हाणामारीत 4 ते 5 जण जखमी

भिवंडी : भिवंडीतील जैतूनपुरा परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून दोन गटामध्ये भरदिवसा जोरदार राडा पाहण्यास मिळाला. या हाणामारीत  4 ते 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. हा संपूर्ण प्रकार जवळपास अर्धा तास सुरु होता. मारहाण करणाऱ्या टोळीच्या हातात दगड, लाकडी दांडका, रॉड इत्यादी साहित्य होते. या मारहाणीत अनेकजण रक्तबोंबाळ झाले होते तर मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि गुन्ह्यांची नोंद भिवंडी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून 20 ते 22 जनाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करीत आहेत. 

ब्रेक दि चेनचे आदेश राज्यात 15 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यत लागू

ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. पॉझिटीव्हीटी जास्त असलेल्या जिल्ह्यातून निर्बंध शिथिल असलेल्या जिल्ह्यात येण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. 

पार्श्वभूमी

Break The Chain | ब्रेक दि चेनचे आदेश 15 जूनपर्यंत लागू, काय सुरु, काय बंद?


ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. पॉझिटीव्हीटी जास्त असलेल्या जिल्ह्यातून निर्बंध शिथिल असलेल्या जिल्ह्यात येण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.


यासाठी 29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.


पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :



  • ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (12 मे 2021 ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील. 

  • सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येतील. 

  • सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र, आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.

  • अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.

  • दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.

  • कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.

  • कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते  


CM Uddhav Thackeray Speech: संपूर्ण देशासाठी एक शैक्षणिक धोरण असायला हवं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावी परीक्षांचा गोंधळ अद्याप कायम आहे. दहावीस बारावी परीक्षांवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, संपूर्ण देशासाठी एक शैक्षणिक धोरण असायला हवं. राज्य सरकारने दहावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला आहे, आता बारावी परीक्षांचा देखील घेणार आहोत. परंतु एका राज्यात होत आहे, दुसर्‍या राज्यात नाही असे न करता एकसमान निर्णय घेतला जायला हवा. धोरण एक हवे. माननीय पंतप्रधानांना यापूर्वी देखील विनंती केली आहे, परत करणार आहे. शिक्षण क्षेत्राबाबत क्रांतिकारक निर्णय घेण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 


कोरोनामुक्त गाव मोहिम राबवायची गरज 


कोरोनाची रुग्णसंख्या शहरी भागात कमी होत आहे मात्र ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे गाव पातळीवर याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. कोरोनामुक्त गाव असं ठरवलं तर गाव कोरोनामुक्त होईल. हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनी हे करुन दाखवलं आहे. घाटणे, तालुका मोहोळ गावचे ऋतुराज देशमुख, तर कोमल करपे, आंतळुली, दक्षिण सोलापूर या दोन तरुण संरपंचांनी आपलं गाव कोरोनामुक्त करुन दाखवलं आहे. आपल्याला देखील आता कोरोनाला हद्दपार करायचा आहे. आपल्याला कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवायची आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.