Breaking News LIVE : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, जयजीत सिंह ठाणे शहराचे पोलीस आयुक्त
Breaking News LIVE Updates, 24 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हीड केअर सेंटरला रोहित पवार यांनी आज सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहित पवार हे रुग्णांच्या चेह-यावरील निराशा दूर करण्यासाठी रुग्णांसोबत सहभागी होत झिंगाट गाण्यावर थिरकले.रोहित पवारांच्या या डान्सची कर्जत तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, जयजीत सिंह ठाणे शहराचे पोलीस आयुक्त, विनित अग्रवाल यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती तर संजय सक्सेना यांची गृह विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती
मुंबईत मागील 24 तासात 1,057 रुग्णांचे निदान, तर 1,312 रुग्ण बरे होऊन घरी, मुंबईतील रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 334 दिवसांवर, सध्या मुंबईत 28,086 अॅक्टिव्ह रुग्ण
खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्विग्न प्रतिक्रिया, माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो , मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती करत आहेत राज्य दौरा, 28 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार, कोणत्याही सरकारविरोधात किंवा पक्षाविरोधात दौरा नाही
राज्य सरकारने माननीय उच्च न्यायालयासमोर स्पष्ट केले की ब्लॅक फंगस आजारासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकास मोफत औषध उपचार हे राज्य सरकारने ठरवून दिलेल्या जवळ-जवळ 130 रुग्णालयात मोफत स्वरूपात मिळतील. हे उपचार महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेखाली पुरवले जातील.
उपचारासाठी 1 हजार रुग्णलयात याला जोडली जातील . अशी माहिती सरकारच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात देण्यात आली आहे . पुढील सुनावणी उद्या .
महात्मा फुले योजने अंतर्गत केवळ दीड लाखांची मदत मिळते मात्र ब्लॅक फंगस उपचारासाठी केवळ इंजक्शनचा खर्च 8 लाख रुपये होतो त्यामुळे अधिकच्या पैस्यांच काय करता येईल का अशी सूचना औरंगाबाद खंडपीठाने दिली होती यावर उत्तर देताना सरकारने मोफत उपचार करण्यात येईल असं सांगितलं आहे ...
विद्यार्थी व शिक्षक यांना व्हॅक्सिन दिल्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत, आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना पत्र
रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतचे संकेत दिले. तसंच मुंबईतील लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
ब्राम्हण समाज आणि इतरही आणखी असे समाज जे आरक्षणापासून वंचित आहेत अशा समाजांसाठी आम्ही महामंडळ उभारण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनाही त्यासाठी विनंती करणार आहोत. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी अशी आमची मागणी आहे.- चंद्रकांत पाटील
नाशिक : मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीन रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक आणि आरोग्य सेवकांना बुस्टर डोस देण्यात आला. प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी ड्रायफ्रूट, अंडी यासह सकस आहार देण्यात आला, गेल्या एक महिन्यापासून कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मनसे पदाधिकारी आणि विद्यार्थी सेनेच्या वतीने सेवा केली जात आहे. हजार बाराशे जणांना नाश्तासह, ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यापासून तर औषधोपचारचा खर्च उचलण्यापर्यंत सर्वच काम केली जात आहे. त्यातच अमित ठाकरे यांच्या वाढदिवासच औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न मनसेच्या युवा पदाधिकारींनी केलाय.
सिंधुदुर्ग : सावंतवाडी जेल मध्ये अटकेत असलेला संशयित आरोपी पळून गेला आहे. हा प्रकार आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला. तो संशयित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत होता. सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव आय.टी.आय इमारती मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या जेलमध्ये त्याला ठेवण्यात आले होते. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांच्याकडून तपास सुरु आहे. आरोपीने पलायन केल्यामुळे जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे.
राज्यभरातील मराठा समाजाच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. 27 तारखेला घेणार मुख्यमंत्र्यांची भेट.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर कोर्टात नियमित सुनावणी घेण्याचं निश्चित झालं आहे. 9 जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली. मात्र तोपर्यंत परमबीर यांनी तपास यंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करावं, अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
सावंतवाडी जेलमध्ये अटकेत असलेला संशयित आरोपी पळून गेला आहे. हा प्रकार आज सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. तो संशयित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत होता. सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव आयटीआय इमारतीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या जेलमध्ये त्याला ठेवण्यात आले होते. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांच्याकडून तपास सुरु आहे. आरोपीने पलायन केल्यामुळे जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे.
मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत होतं, पण त्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यावर सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट. संभाजीराजे छत्रपती 27 तारखेला शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. शिवभक्तांना रायगडाचे वेध, नियोजनासाठी प्राथमिक बैठका सुरू. 'शिवराय मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात' या पद्धतीने सोहळा साजरा होण्याची शक्यता. ऑनलाईन पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न होणार
नाशिक : नाशिक जिल्ह्यात 10 दिवसाच्या लॉकडाऊननंतर आजपासून जिल्ह्यातील बाजारपेठा सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व कांद्याच्या बाजार समितीत आजपासून लिलाव सुरु होत असून ज्यांनी नोंदणी केलीय आणि कांदा विक्रीला येणाऱ्या शेतकऱ्याची अंटीजेन टेस्ट रिपोर्ट अशांनाच बाजार समितीत प्रवेश दिला जात आहे.
मुंबईतील बीकेसी, मुलुंड, दहिसर कोविड सेंटरमध्ये मान्सूनपूर्व दुरुस्तीची काम सुरु करणार आहेत. त्यामुळे या तिन्ही कोविड सेंटरमध्ये 1 जूनपर्यंत नवे रुग्ण घेतले जाणार नाहीत. पुढील आदेशापर्यंत नव्या रुग्णांची भरती केली जाणार नाही, अशी माहिती बीकेसी कोविड सेंटरचे डीन डॉ. राजेश डेरे यांनी दिली.
अमरावती : आज चौथ्या दिवशी लसीकरण केंद्र सुरु होणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून अमरावतीतील लसीकरण केंद्र बंद होती. 45 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळांमध्ये देण्यात येणार आहे. 70 टक्के ऑनलाईन पद्धतीने तर 30 टक्के टोकन पध्दतीने नोंदणी करण्यात येणार आहे. पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेल्यानांच दुसरा डोस मिळणार आहे.
पार्श्वभूमी
राज्यात रविवारी 29,177 रुग्णांना डिस्चार्ज, 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात काल 29,177 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुर्दैवाने काल 594 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे.
आजपर्यंत एकूण 51,40,272 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.12% एवढे झाले आहे. राज्यात आज 594 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,30,13,516 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,79,897 (16.9 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 26,96,306 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 21,771 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 3,48,395 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
'आम्ही अॅलोपॅथी विरोधी नाहीत, मी वक्तव्य मागे घेतो', बाबा रामदेव यांचं आरोग्यमंत्र्यांच्या पत्राला उत्तर
योगगुरु बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीवर केलेलं वादग्रस्त वक्तव्य मागे घेतलं आहे. योगगुरु रामदेव यांनी कोरोना मृत्यूंमागे अॅलोपॅथी कारण असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर डॉक्टर्स आणि संघटनांकडून संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी पत्र लिहित रामदेव बाबांना वक्तव्य पूर्णपणे मागे घेण्याचं आवाहन केलं होतं.
बाबा रामदेव यांनी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'डॉ. हर्ष वर्धन जी आपलं पत्र मिळालं. त्यासंदर्भाने चिकित्सा पद्धतीवरील संघर्षाच्या या पू्र्ण वादाला मी विराम देत आहे. मी माझं वक्तव्य मागे घेत आहे. आम्ही अॅलोपॅथीचे तथा आधुनिक उपचार पद्धतीचे विरोधक नाही. आम्ही हे मान्य करतो की जीव वाचवण्यासाठी आधुनिक अॅलोपॅथीनं खूप प्रगती केली आहे आणि मानव सेवा केली आहे. माझं जे वक्तव्य कोट केलं आहे ते मी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्हॉट्सअॅपवरील आलेला मेसेज वाचून दाखवलेलं आहे. यामुळं कुण्याच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -