Breaking News LIVE : मराठा आरक्षण; 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात खंडपीठाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका दाखल

Breaking News LIVE Updates, 13 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 May 2021 09:47 PM
महिलेला थुंकी चाटायला लावल्याचे प्रकरण, दहा पंचांवर चोपडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल

अकोला जिल्ह्यातील वडगाव येथील जात पंचायतीने महिलेला थुंकी चाटायला लावल्याचे प्रकरण. जात पंचायतीमधील दहा पंचांवर जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल. 9 एप्रिलला जातपंचायतीमध्ये प्रकार घडल्याचा पीडितेचा आरोप. चोपडा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर प्रकरण तपासासाठी केलं अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलिसांकडे वर्ग. या प्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीसाठी शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी गृहमंत्र्यांना लिहिले आहे पत्र.

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घडामोड

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घडामोड, 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात खंडपीठाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका दाखल, राज्यांना ओबीसी लिस्टमध्ये समावेशाचे अधिकार नाहीत, खंडपीठाने दिला होता निर्णय

मुंबईत आज 1946 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2037 रुग्णांना डिस्चार्ज, सध्या एकूण 38,649 सक्रिय रुग्ण

मुंबईत आज 1946 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2037 रुग्णांना डिस्चार्ज, सध्या एकूण 38,649 सक्रिय रुग्ण

बीड जिल्ह्यात पुन्हा दहा दिवसांसाठी कडक निर्बंध

बीड जिल्ह्यात पुन्हा दहा दिवसांसाठी कडक निर्बंध. बीड जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा जिल्ह्यात दहा दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 मे रोजी रात्री 12 वाजतापासून म्हणजेच 16 मे पासून 25 मे रोजी रात्री 12 वाजतापर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत.

महाराष्ट्रात एकूण केसेस 5 लाख 46 हजारांवर, रुग्णसंख्या 7 लाख केसेसवरुन 5 लाखांवर

महाराष्ट्रात एकूण केसेस 5 लाख 46 हजारांवर, रुग्णसंख्या 7 लाख केसेसवरुन 5 लाखांवर, रिकव्हरी रेट वाढलाय., ग्रोथ रेट 1 टक्केपेक्षा खाली, देशाचा ग्रोथ रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त, रुग्णदराबाबत महाराष्ट्राचा देशात 31 वा क्रमांक

स्पुटनिक V कोरोना प्रतिबंधक लस भारतात दाखल, पुढील आठवड्यापासून विक्री सुरु

स्पुटनिक V कोरोना प्रतिबंधक लस भारतात आली आहे.. पुढील आठवड्यापासून बाजारात ही लस उपलब्ध होईल. रशियातून आता ज्या काही मर्यादित लसींचे डोस मिळाले आहेत, त्याची विक्री पुढील आठवड्यापासून सुरु होईल

दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, जनहित याचिका दाखल

दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात कार्यरत असलेल्या विविध बोर्डांमध्ये एकवाक्यता नाही, राज्य सरकारही परिक्षांच्या बाबतीत गोंधळलेली आहे. आधी परीक्षा घेण्यावर ठाम होते, मग ऐनवेळी परिक्षा रद्द केल्या. त्यातही दहावी बोर्डाच्या परिक्षा रद्द केल्या मात्र बारावी बोर्डाच्या परीक्षा घेणार असं जाहीर केलंय. तर अकरावीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंतर्गत गुणांवर ठरवणार आहेत. तर मग हे सारं करताना दहावीच्या परिक्षा रद्द करून सरकारनं काय साध्य केलं? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर याचा काय परिणाम होईल याचा विचार हा निर्णय घेताना केलेलाच नाही असा आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे. त्यामुळे दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती देऊन या परिक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी यातनं करण्यात आली आहे. पुण्यातील नागरीक धनंजय कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर गुरूवारी सुनावणी घेण्यास हायकोर्टानं नकार दिल्यानं पुढील आठवड्यांत दुस-या खंडपीठापुढे यावर सुनावणी होणार आहे.

 वर्ध्यातील माग्मो संघटनेच कामबंद आंदोलन स्थगित, जिल्हाधिकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित

 वर्ध्यातील माग्मो संघटनेच कामबंद आंदोलन स्थगित, जिल्हाधिकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित, आमदार रणजित कांबळे यांच्यावर दाखल गुन्ह्यात वाढ करण्यासह साथरोग कायद्याअंतर्गत  गुन्ह्यात वाढ करण्याची केली आहे मागणी, या संदर्भात कलम वाढवणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. स्वप्नील बेले यांनी दिली 

उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही, बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

पालघर : बोईसर-तारापूर MIDC मध्ये सिनय कंपनीच्या शेजारी उभ्या असलेल्या केमिकल टँकरला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

पालघर जिल्ह्यातील बोईसर-तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर एन 172 मध्ये सिनय कंपनीच्या शेजारी भीषण आग लागली. रस्त्यावर उभ्या असलेल्या केमिकल टँकरला आग लागल्यानंतर शेजारी असलेल्या मैदानातील पाईप आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. शॉर्ट सर्किटमुळे टँकरला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे लोळ पसरले असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट नियमबाह्य, किरीट सोमय्या यांचा आरोप

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आणखी एक आरोप केलाय. दापोलीमध्ये पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करत रिसॉर्ट उभारल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. किरीट सोमय्या यांनी आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली आहे

केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर

केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर ढकलण्यात आली आहे. 27 जून रोजी होणारी परीक्षा आता 10 ऑक्टोबरला होणार आहे. यापूर्वीही अनेक परीक्षा कोरोना प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. 

संचारबंदीच्या काळात उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

उल्हासनगर : संचारबंदीच्या काळात उल्हानसगर शहरात दुचाकी चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातलाय. दुचाकीं चोरट्यांच्या आठ जणांच्या टोळक्याने दुचाकीची चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पंजाबी कॉलनी परिसरात 10 मे रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्याची टोळी रस्त्यावर फिरत एक दुचाकी चोरली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात  अज्ञात टोळक्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.  

तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील सिनय कंपनीच्या बाजूला असलेल्या पाईपला भीषण आग

पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर एन 172 मधील सिनय कंपनीच्या बाजूला असलेल्या पाईपला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही,

तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील सिनय कंपनीच्या बाजूला असलेल्या पाईपला भीषण आग

पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर एन 172 मधील सिनय कंपनीच्या बाजूला असलेल्या पाईपला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही,

सोलापुरात भाजपच्या आमदार, खासदारांचे आंदोलन

रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि लसींच्या पुरवठ्यात सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत भाजपच्या सर्व आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण सुरु आहे. 

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाची स्थिती पुन्हा गंभीर

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची स्थिती पुन्हा गंभीर बनत चालली असून रुग्णसंख्येमध्ये पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 626 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत असून दाखल होणाऱ्या रुग्णांना कोविड सेंटर बाहेरच ऑटो रिक्षामध्ये ऑक्सीजनवर राहण्याची वेळ आली आहे.

राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला, राज्य सरकारचे परिपत्रक जारी


राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या संबंधी एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. 

नागपुरात लसीकरणाला वेग, शहरातील 98 केंद्रावर लसीकरण सुरु

आज नागपूर शहरातील 110 पैकी 98 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. कालच राज्य सरकारने 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 45 पेक्षा जास्त वयोगटासाठी आज शहरातील बहुतांशी लसीकरण केंद्रावर सकाळपासून लसीकरण केले जात आहे. काल नागपूर शहरामध्ये अवघ्या 963 जणांचा लसीकरण पार पडलं होतं तर नागपूर ग्रामीणमध्ये 8,408 लोकांचे लसीकरण पार पडलं होतं. 


 

खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आणि कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक वर्षाची फी माफ करा, राज्य सरकारकडे मागणी
खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आणि कोविड रुग्णांवर उपचार करण्याऱ्या विद्यार्थ्यांची एक वर्षाची फी माफ करा, अशी मागणी यामधील निवासी डॉक्टरांनी राज्य सरकारकडे केली आहे. निमशासकीय (खाजगी) मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांची एक वर्षाची कॉलेज फी सरकारने फी माफ करावी, अशी ही मागणी आहे. हे विद्यार्थी मागील वर्षभरापासून कोविड रुग्णांना उपचार देण्याचं काम करत आहेत तर दुसरीकडे हेच विद्यार्थी खाजगी मेडिकल कॉलेजच्या शुल्क समितीने नेमून दिलेली 10 ते 15 लाख फी भरत आहेत. पण कोविड रुग्णांना उपचार देताना दुसरीकडे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी या विद्यार्थ्यांचा कोविड रुग्णांना सेवा द्यायला विरोध नसून वाटेल ती सेवा बजावायला हे विद्यार्थी तयार आहेत. या महामारीच्या दरम्यान याच विद्यार्थ्यांचा पालक वर्ग आर्थिक संकटात असताना जर खाजगी मेडिकल कॉलेजची वर्षभराची फी माफ केली तर त्यांची चिंता दूर होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी मागणी खाजगी रुग्णलयातील निवासी डॉक्टरांकडून केली जात आहे.
अहमदनगर : जामखेड तालुक्यात नवविवाहित पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर : जामखेड तालुक्यात नवविवाहित पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नीने आत्महत्या केल्याची समजल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. अहमदनगर जामखेड शहरातील बीडरोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. शिल्पा अजय जाधव (वय 28) असं पत्नीचे नाव होतं तर अजय कचरदास जाधव (वय 32 )नपतीचे नाव होतं. या दोघांनी आत्महत्या का केली या बाबत अद्याप काही समजू शकले नाही. पतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, की माझ्या आत्महत्यास मी जबाबदार असुन कोणासही दोषी ठरवू नये.

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षवाद्यामंध्ये मोठी चकमक, चकमकीत दोन नक्षलवादी ठार

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील सावरगाव लगतच्या मोरचुल जंगलात पोलीस आणि नक्षवाद्यामंध्ये मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. आज सकाळी गडचिरोली पोलीस दलाचे सी 60 कमांडोचे या भागात अभियान सुरु असताना नक्षलवाद्यानी जवानांवर अचानकपणे गोळीबार सुरू केला. त्याला जवानानी ही प्रतिउत्तर दिले. अर्ध्या तासाच्या चकमकीनंतर दोन नक्षल्याना कंठस्नान घातल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला नक्षलवाद्यांचा समावेश असून अजुनही या भागात जवानांचे शोध मोहिम सुरु आहे.

वर्ध्यात लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी, पहाटे 5 वाजल्यापासून लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा

वर्ध्यात लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून नागरिकांनी नंबर लावण्यासाठी लसीकरण केंद्रांवर रांगा लावल्या. वर्ध्यात 4 केंद्रावर कोवॅक्सिनचा दुसरा डोज देण्याची सोय करण्यात आली आहे. रांगेत उभे राहताना ज्येष्ठ नागरिकांची फरफट झाल्याचं समोर आलं आहे. केंद्रावरील असुविधांमुळे लसीकरणसाठी आलेल्या नागरिकांचा संताप झालेला पाहायला मिळाला.

Mumbai Vaccination : मुंबईत लसीकरणासाठी मनपा आयुक्तांकडून नवी नियमावली जारी

Mumbai Vaccination : मुंबईत लसीकरणासाठी मनपा आयुक्तांकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार सोमवार ते बुधवार ज्येष्ठ आणि दिव्यांगांना विनानोंदणी डोस घेता येणार आहे. तर उर्वारित 3 दिवस 100 टक्के नोंदणीधारकांचं लसीकरण होणार आहे. मुंबई महापालिका आयक्त इक्बालसिंह चहल यांनी माहिती दिली आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये किमान एक लसीकरण केंद्र उभारा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. 

कोल्हापुरात मोफत श्रीखंडासाठी शेकडोची रांग, कोरोनाच्या नियमांचा फज्जा

कोल्हापुरात वारणा दूध संघाच्या सभासदांसाठी मोफत श्रीखंड वाटप सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या दाभोलकर कॉर्नर जवळील दूध विक्री केंद्रात गर्दी जमल्याचं दिसून येतंय.  जिल्ह्यात कोरोनाचे आकडे वाढत असताना ही अशी गर्दी होणं धोकादायक ठरत असून यावेळी कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडाल्याचं दिसून येतंय

राज्य आर्थिक संकटात असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी वर्षाला 6 कोटींचा निधी राखीव

राज्य आर्थिक संकटात असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी वर्षाला 6 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे, यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात कोरोना महामारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला आहे. 

पंतप्रधान मोदी 20 मे रोजी महाराष्ट्रासह दहा राज्यांमधल्या 54 जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 मे रोजी कोरोनामुळे प्रभावित 10 राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत करणार आहेत. महाराष्ट्रासह दहा राज्यातल्या 54 जिल्हाधिकार्‍यांसोबत स्थितीचा आढावा घेणार आहेत

पॉकेटमनीमधून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था, कोल्हापुरातील चार तरुणींचा उपक्रम

जगात भारी आम्ही कोल्हापुरी म्हणतात ते उगाच नाही. कोल्हापूर शहरातील चार तरुणींनी आपल्या मिळणाऱ्या पॉकेटमनीमधून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था केली आहे. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयाच्या बाहेर त्या चार तरुणी दररोज नाश्ता घेऊन उभ्या असतात. लस मिळणार का या संदर्भात चौकशी करण्यासाठी आल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांचे होणारे हाल पाहून त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. या तरुणींना पाहून आता समाजातील दानशूर व्यक्ती देखील पुढे येऊन मदत करत आहेत. हा उपक्रम अन्य रुग्णालयांच्या बाहेर देखील सुरु ठेवण्याचा मानस या तरुणींचा आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 28 हजार कोविशील्ड लसींचा साठा पोहोचला, लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात 28 हजार कोविशील्ड लसींचा साठा पोहोचला असून आजपासून लसीकरणाच्या कामाला सुरुवात होत आहे. जिल्ह्यात आजपासून ग्रामीण भागातील 104 आणि चंद्रपूर शहरातील 16 केंद्रांवर या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून लसींअभावी चंद्रपूर जिल्ह्यात लसीकरण ठप्प होते. त्यामुळे आज सकाळी 5 वाजल्यापासून लोकांनी लसीकरण केंद्रावर टोकन मिळविण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील सिरसी जंगलात चितळाची शिकार

चंद्रपूर जिल्ह्यातील सिरसी जंगलात चितळाच्या शिकारचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी सिरसी गावातील दोन आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतलेले आहे. राजुरा तालुक्यातील सिरसी भागात अवैध शिकार झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. वनपथकाने सिरसी गावातील देवराव सिडाम याच्या घरी जावुन घराची झडती घेतली. यात अंदाजे चितळाचे 10 किलो मास आढळुन आले. घटनास्थळी मासाची विल्हेवाट लावतांना किशोर तोडासे हा इसम आढळुन आला. त्याला ताब्यात घेत या घरून चितळाचे मास व मुंडके, सुरी, विळा, कुऱ्हाड आदी साहित्य जप्त करण्यात आले. मात्र वनकर्मचारी येण्याचा सुगावा लागताच 3 आरोपी फरार झाले असून पुढील तपास सुरु राजुरा वनविभाग करत आहे.  

उस्मानाबादमध्ये आज लसीकरण बंद, सरकारकडून कोणतीही माहिती न मिळाल्याने आजही रुग्णालयासमोर पहाटे तीन वाजल्यापासून रांगा

राज्य सरकार लोकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहे की काय असा प्रश्न पडत आहे. राज्यात लसीचा पुन्हा तुटवडा निर्माण झाला आहे. कालपासून सुरु झालेले दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण बंद करण्यात आलं आहे. परंतु त्या संदर्भातली कोणतीही माहिती राज्य शासनाच्या माहिती विभागाच्या वतीने काल रात्री जारी करण्यात आली नाही. त्यामुळे आजही उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयासमोर पहाटे तीन वाजल्यापासून लोक जमा झाले होते. अनेक दिवसांपासून दुसऱ्या डोससाठी असलेली लोकांची प्रतीक्षा काल संपली. त्यामुळे दुसरा डोस मिळेल या आशेने काल लोकांनी दीड ते दोन किलोमीटरची रांग लसीकरण केंद्राबाहेर लावली होती. परंतु काल ही रांगेत असलेल्या दीड-दोन हजार लोकांपैकी अवघ्या तीनशे ते चारशे जणांना लसीचा डोस मिळाला. याचीही माहिती प्रशासनाला काल जाहीर केलेली नव्हती. लसीकरणाच्या पहिल्या दिवसानंतर आज लसीकरण बंद असणार आहे. लसीचा साठा संपला आहे, याचीही कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर केली गेली नाही. त्यामुळे कालची गर्दी पाहून आज लोकांनी पुन्हा लसीच्या डोससाठी गर्दी केली. कालचा अनुभव बघून आज तर पहाटे साडेतीन वाजल्यापासून लोक लसीकरण केंद्राच्या बाहेर उभे आहेत. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्राच्या समोर आल्यानंतर लोकांना आज लसीकरण बंद आहे, असे फलक दिसत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे.

अकरावी CET प्रवेश परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचा अंतिम तोडगा लवकरच, शिक्षण विभागाचा सर्वेक्षण अहवाल शासनाला सुपूर्द

दहावी विद्यार्थ्यांसाठीची अकरावी प्रवेशासाठी ही सीईटी परीक्षा राज्यभरात ऑफलाईन पद्धतीने जुलै महिन्यात किंवा राज्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळेच्या ठिकाणी घेण्याचे नियोजन असल्याच शिक्षण विभागकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे, शिक्षण विभाग दहावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत नसल्याने अंतर्गत मूल्यमापणासाठी नेमके काय निकष अवलंबावे याबाबत विचार विनिमय करत आहे. विविध शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांच्याशी चर्चा करून यावर सुद्धा लवकर तोडगा काढण्याचे काम सुरु आहे. अशातच राज्यातील दहावीचा वर्ग असलेल्या विविध शाळांचे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण शिक्षण विभागाकडून केले जात आहे.  


आता हा सर्वेक्षण अहवाल शासनाकडे सुपूर्द केला असून ज्या शाळांनी अंतर्गत मूल्यमापनाची तयारी नसल्याचं सांगितले आहे. त्याबाबत काय निर्णय घेणार, काय पर्याय समोर आणणार? शिवाय अकरावी प्रवेशासाठी सीईटी घ्यावी की नाही याबाबत सुद्धा अधिकृत निर्णय होईल.

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मॅट कोर्टाचा दिलासा

काही दिवसांपूर्वी सात मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दया नायक यांच्या नावाचा सुद्धा समावेश होता. दया नायक यांची गोंदियामध्ये बदली करण्यात आली होती. मात्र याविरोधात दया नायक यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर मॅट कोर्टाकडून आज दया नाईक यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या बदलीवर कोर्टाने स्थगती दिली आहे. दया नायक यांची ओळख एक एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणूनही आहे. दया नायक यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून अनेक एन्काऊंटरही केले आहेत. मात्र वरिष्ठांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची बदली गोंदियाला करण्यात आली होती. त्यामुळे दया नायक यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती.

ईदच्या पार्श्वभूमीवर मुंब्र्यातील बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी

ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरातील मुंब्रा इथे प्रचंड गर्दी बघायला मिळाली. रस्त्यावर पाय ठेवायला देखील जागा नव्हती इतकी गर्दी मुंब्रा इथे बघायला मिळाली. रस्त्यावरील गर्दीमुळे वाहनांना जायला देखील जागा नव्हती. रमजाननंतर येणारी ही ईद मुस्लीम बांधवांचा मोठा सण समजला जातो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री मुंब्रा इथल्या बाजारात होते. अमृत नगर ते कौसापर्यंतच्या रस्त्यावर नागरिक कोणतेही नियम न पाळता फिरताना आढळले. आजही अशाच प्रकारे गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान बुधवारी गर्दी आवरण्यासाठी पोलीस किंवा पालिका कर्मचारी कुठेही दिसून आले नाहीत. या गर्दीकडे बघून आटोक्यात आलेली कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे

वर्ध्यातील आर्वीमधल्या तहसील कार्यालय परिसरातील इमारतीला भीषण आग, विविध विभागातील कागदपत्रे जळाली

वर्ध्याच्या आर्वी इथल्या तहसील कार्यालय परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागली. यामध्य तहसील कार्यालयाच्या वेगवेगळ्या विभागांतील कागदपत्रे जळाली असून रजिस्ट्रार कार्यालय, रेकॉर्ड रुमचेही मोठं नुकसान झालं आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर काही विभागातील रेकॉर्ड सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मालेगावमध्ये ईदच्या खरेदीसाठी मोठी गर्दी, पोलिसांकडून बॅरिकेट्स लावून रस्ते आणि दुकानं बंद

रमजान ईदचे चंद्र दर्शन बुधवारी न झाल्याने मालेगाव शहरात ईदच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. संध्याकाळपासून शहरातील किदवाई या मुख्य रस्त्यावर खरेदीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. नाशिक जिल्ह्यात बुधवारीपासून दुपारपासून लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर दुपारी या परिसरातील व्यवसायिकांची दुकानं बंद होती. मात्र ईदचा दिवस पुढे गेल्याने संध्याकाळी पुन्हा एकच गर्दी झाली. अखेर पोलिसांनी रात्री या रस्त्यावर बेरिकेट्स लावून रस्ते बंद केले आणि सगळी दुकानं बंद केली. मागील वर्षी रमजान काळात कडक लॉकडाऊन आणि मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याने इथल्या नागरिकांना ईद साजरी करता आली नव्हीत. मात्र या वर्षी लॉकडाऊन असला तरी स्थानिकांचा दबाव असल्याने काहीशी सूट देण्यात आली. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी उसळली आणि सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला.

कथित गोळीबार प्रकरणानंतर आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा आणि पीएसह दहा जणांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंचा मुलगा आणि पीएसह दहा जणांवर जीवघेणा हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सिद्धार्थ बनसोडे असं आमदार पुत्राचे नाव आहे. 11 मेच्या दुपारी पिंपरी पालिकेचे कंत्राटदार सिजू अँथोनी यांच्या कार्यालयात ते घुसले आणि दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. लोखंडी टॉमीसारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झालं आहे. अँथोनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी सावंत हे कुठे आहेत, हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदार पुत्र आणि पीएसह दहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचं गुन्ह्यात नमूद आहे.

पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधी पक्षातील नेत्यांचं पत्र, आठ महत्त्वाच्या मागण्या
विरोधी पक्षातील 12 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबवून मोफत व्यापक कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात या पक्षांनी म्हटले आहे, की सर्व बेरोजगारांना दरमहा सहा हजार रुपये द्या, गरजूंना मोफत धान्य द्या. लाखो 'अन्नदात्याला' साथीच्या आजारापासून वाचवण्यासाठी नवीन कृषी कायदे रद्द करा. विरोधी पक्षनेत्यांनीही सरकारला त्यांच्या सूचनांना प्रतिसाद देण्याची विनंती केली आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या सूचनांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हे पत्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांच्यासह ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन, स्टॅलिन यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांकडून पत्र लिहण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर पीपल्स अलायन्सतर्फे फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, माकपचे सरचिटणीस डी राजा आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे पत्र पाठविणार्‍या नेत्यांमध्ये आहेत.


राज्यात कोरोनाचा आलेख उतरतोय, बुधवारी 58 हजार 805 रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यात बुधवारी 46 हजार 781 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले तर 58,805 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.01% एवढे झाले आहे. राज्यात काल 816 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,01,00,958 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52,26,710 (17.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36,13,000 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,417 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल एकूण 5,46,129 सक्रीय रुग्ण आहेत.


लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची सर्वच मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : राजेश टोपे
राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली आहे. मात्र लॉकडाऊन बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते. तसेच राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणाला तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याची गरज आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना वेळेत दुसरा डोस न दिल्यात पहिला डोसचा प्रभाव होणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. 


कोरोनाविषयी भारताचा अंदाज चुकला, वेळेआधीच लॉकडाऊन उठवल्याने परिस्थिती गंभीर : अमेरिकन तज्ज्ञ डॉ. फौची
कोरोना महामारी संपली असा चुकीचा समज तयार करुन भारताने वेळेआधीच लॉकडाऊन काढल्याने सध्या देश गंभीर संकटात अडकल्याचे अमेरिकेचे वरीष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथोनी फौची यांनी सांगितले. कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा जबरदस्त तडाखा भारताला बसला आहे. अनेक राज्यात रुग्णालये, आरोग्य कर्मचारी, लस, ऑक्सिजन, औषधे आणि बेड्सच्या तुटवड्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. कोरोना प्रतिक्रियांवरील सुनावणी दरम्यान मंगळवारी फौची यांनी सिनेट आरोग्य, शिक्षण, कामगार आणि निवृत्तीवेतन समितीला सांगितले की, “कोरोना आता संपला अशी समजूत घालत भारताने वेळेआधीच लॉकडाऊन काढल्याने सध्या देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे डॉ. फौची म्हणाले. डॉ. फौची हे अमेरीकेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अ‍ॅन्ड इन्फेक्टीव्ह डिजीजिस (एनआयएआयडी) चे संचालक आहेत आणि अध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार देखील आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.