उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मुस्कानने प्रियकरासह पती सौरभची हत्या केल्यानंतर आता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्वाल्हेरच्या तारागंज पुल भागात राहणाऱ्या तरुणाला, त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने त्याला आपल्या कारने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. झाशी रोड बसस्थानकाजवळ ही घटना घडली, याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
प्रियकरच्या कारने जोरदार धडक दिली आणि काही अंतरावर फरफटत नेले
पती अनिल पाल यांचा आरोप आहे की, 20 मार्च रोजी पत्नी आजारपणाच्या बहाण्याने घराबाहेर पडली होती. अशा स्थितीत पत्नी घरातून निघून गेल्यावर तो तिच्या मागे लागला. यानंतर अनिल पालने पत्नीचा प्रियकर मंगल सिंहसोबत कारमध्ये पाहिले. पत्नीच्या सिग्नलवर तो तिला रंगेहाथ पकडण्यासाठी कारजवळ गेला असता, तिच्या प्रियकरच्या कारने जोरदार धडक दिली आणि काही अंतरावर फरफटत नेले. या हल्ल्यात अनिल गंभीर जखमी झाला.
सीसीटीव्ही फुटेज समोर आले
या हल्ल्यानंतर अनिल पालने पत्नी आणि तिचा प्रियकर मंगल सिंह कुशवाह यांच्याविरोधात झाशी रोड पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पती अनिल पालने पोलिसांना सीसीटीव्हीही उपलब्ध करून दिला आहे, ज्यामध्ये एक निळ्या रंगाची कार तिला धडकून फरफटत नेताना दिसत आहे. या प्रकरणाबाबत डीएसपी रॉबिन जैन यांनी सांगितले की, पतीच्या तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आला आहे.
लग्नापूर्वी प्रेमप्रकरण सुरू होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल स्टोअर ऑपरेटर अनिल पाल यांचा आठ वर्षांपूर्वी टेकनपूर येथील एका तरुणीशी विवाह झाला होता. अनिलने पोलिसांना सांगितले की, पत्नी वारंवार तिच्या माहेरच्या घरी जात असे. काही वर्षांनंतर, टेकनपूरच्या मंगल सिंगसोबत तिचे पूर्वीपासून प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या