Shambhuraj Desai on Kunal Kamra : स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबन गीतावरून वाद सुरूच आहे. कामराने शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली होती. आता मंत्री शंभूराज देसाई यांनी कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला आहे. शिंदे यांनी सांगितल्याने शिवसैनिक गप्प असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
कुणाल कामरा मर्यादेच्या बाहेर गेला
शंभूराज देसाई म्हणाले की, कुणाल कामरा मर्यादेच्या बाहेर गेला आहे. पाणी डोक्यावरून गेले आहे. आम्ही त्याच्या स्टुडिओत जाऊन त्यांनी शिंदेसाहेबांबद्दल काढलेल्या व्हिडिओचा प्रसाद त्यांना दिला. आता तो मुद्दाम रोज एक नवीन व्हिडिओ रिलीज करत आहे. तो हा प्रकार जाणूनबुजून करत आहे.
आमच्याच भाषेत उत्तर देऊ
देसाई म्हणाले की, कामराने आधी शिंदे साहेबांची बदनामी केली. त्यानंतर सीतारामन मॅडमची बदनामी केली. तसेच पंतप्रधान मोदींबद्दल चुकीचे शब्द वापरले. सुप्रीम कोर्टावर चुकीचे विधानही केले. आता वेळ आली आहे की आम्ही शिवसैनिकांनी त्याला शिवसेनेच्या भाषेत उत्तर द्यायला हवे. आम्ही मंत्री आहोत पण शिवसैनिक आधी येतात. आमची सहनशीलता आता संपली असून आता आम्ही त्यांना आमच्याच भाषेत उत्तर देऊ.
कामराने कुठे भेटायचे ते सांगावे
ते म्हणाले की तो कुठेही असला तरी तो कोणत्याही बिळात लपूदे, त्याला पकडून परत आणून प्रसाद दिला जाईल. कामराला त्याच्या बिळातून बाहेर काडून प्रसाद दिला जाईल. आम्हाला नुकतेच थांबवले आहे, पण कामराने कुठे भेटायचे ते सांगावे. आम्ही शिवसैनिक भेटून प्रसाद देऊ.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आपल्या कमेंट्स आणि बुद्धीने लोकांना हसवणाऱ्या कुणाल कामराने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. 'दिल तो पागल है' या बॉलिवूड चित्रपटातील गाण्यावर त्याने विडंबन केले होते. या गाण्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. गद्दार असा उल्लेख केल्याने शिंदे गटात खळबळ उडाली आहे.
हा व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेनेचे (शिंदे गट) नेते संतापले. हा व्हिडीओ समोर येताच शिवसैनिक संतप्त झाले आणि त्यांनी रविवारी मुंबईतील खार भागात असलेल्या स्टुडिओ आणि हॉटेल युनिकॉन्टिनेंटलची तोडफोड केली. दरम्यान, कुणाल कामराविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. शिंदे सेनेचे आमदार मुराजी पटेल यांनी तक्रार दाखल केली. शिवसेनेचे कार्यकर्ते देशभरात त्याचा पाठलाग करतील, असा इशारा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी कामराला दिला. तुम्हाला भारतातून पळून जाण्यास भाग पाडले जाईल, असे त्यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. वादानंतर बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील हॅबिटॅट स्टुडिओचा एक भाग पाडला. याच स्टुडिओमध्ये कामराने शो केला होता ज्यामध्ये शिंदे यांच्यावर विडंबन केलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या