(Source: ECI/ABP News/ABP Majha)
युती होगी तो ठीक, नही हुई तो पटक देंगे : अमित शाह
युती न करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला अमित शाह यांनी सडेतोड उत्तर दिलं. युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे, अशा शब्दात अमित शाह यांनी भाजपची भूमिका मांडली.
लातूर : युतीच्या मुद्द्यावरुन आता भाजपनेही शिवसेनेच्या सुरात सूर मिसळला आहे. शिवसेनेच्या स्वबळाच्या भूमिकेनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आगामी निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. लातूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात अमित शाह आणि मुख्यमंत्री बोलत होते.
आगमी निवडणुकीत भाजपसोबत न जाण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला अमित शाह यांनी सडेतोड उत्तर दिलं. युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे, अशा शब्दात अमित शाह यांनी भाजपची भूमिका मांडत एकप्रकारे शिवसेनेला इशारा दिला.
शिवसेनेसोबत युतीबाबतच्या कन्फ्युजनमधून(संभ्रम) कार्यकर्त्यांनी बाहेर पडावं. मित्रपक्ष सोबत आला तर त्यांना जिंकवू अन्यथा त्यांचाही पराभवाची धुळ चारु. त्यासाठी प्रत्येक बुथवर तयारी सुरु करा, विजय आपलाच होईल, अशा सूचना अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. स्वबळावर निवडणुका लढवून भाजप 48 पैकी किमान 40 जागा जिंकेल असा दावाही अमित शाहांनी केला.
यापूर्वी मित्रपक्षांनी लढवलेल्या सर्व जागा भाजप लढवणार आणि विजयी करणार, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी मित्रपक्षाच्या संदर्भात संभ्रमात राहू नये, सर्व जागा भाजप लढवणार आहे. युती न झाल्यास भाजप 48 पैकी 40 जागा जिंकू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या स्वबळाच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रथमच भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील नेत्यांची वक्तव्य आणि देहबोलीवरुन युती होणार नाही हे जवळपास स्पष्ट झालं आहे.