(Source: ECI/ABP News/ABP Majha)
किरीट सोमय्या हे धाडसी नेते, ते कुठेही गेले नाहीत, लवकरच पोलिसांच्या चौकशीला सामोरं जातील: प्रवीण दरेकर
Pravin Darekar : खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर दबाव आणून आपल्यावर कारवाई केल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केला आहे.
मुंबई: किरीट सोमय्या हे धाडसी नेते आहेत, ते कुठेही गेले नाहीत. किरीट सोमय्या हे पोलिसांच्या चौकशीला सामोरं जातील असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीच गृहमंत्र्यांवर दबाव आणून आपल्यावर कारवाईसाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले की, "किरीट सोमय्या हे धाडसी नेते आहेत.ते शब्द पाळणारे असून त्यांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आणली आहेत. ते अनेकांना पळवणारे नेते आहेत. ते कुठेही पळून गेले नाहीत. लवकरच ते पोलिसांच्या चौकशीसाठी सामोरं जातील."
दरम्यान, बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे.प्रवीण दरेकरांना हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांची दोन वेळा चौकशी केली होती.दरेकर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.प्रवीण दरेकरांना जामीन मंजूर होणं म्हणजे, दरेकरांविरोधात चौकशी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
सोमय्या पिता-पुत्रांचा जामीन नाकारला
आयएनएस विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्यांचा अटकपूर्वी जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं सोमवारी फेटाळला होता. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आली आहे.
काय आहे प्रकरण?
शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं होतं. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबतही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयानं दिली असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा असं आव्हानही राऊत यांनी केलं. सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचा याची त्यांनी माहिती असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.