मुंबई :  मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या पत्रानंतर अनिल देशमुख यांनीही एक पत्रक काढत आपली बाजू मांडली असून आरोप सिद्ध करावेत अन्यथा परमबीर सिंह यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे. या पत्रानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.  


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लगावले आहेत, ते अतिशय धक्कादायक आणि निंदनीय आहे. आता हे स्पष्ट आहे की ठाकरे सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे केवळ अनिल देशमुखांनीच नव्हे तर संपूर्ण ठाकरे सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावे, असं त्यांनी म्हटलं आहे. 

परमबीर सिंह यांचा लेटर बाँम्ब! जाणून घ्या या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं...


चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेलं आहे हे या ठाकरे सरकारने पदोपदी सिद्ध केले. अनिल देशमुख हे सचिन वाझेंना महिना 100 कोटी रुपयांची वसुली करायला सांगायचे. पोलिसांना वसूली करायला लावणारा गृहमंत्री महाराष्ट्र कदापी सहन करु शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. 


परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार : गृहमंत्री


त्यांनी म्हटलं आहे की, ठाकरे सरकार हे पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतलेले आहे. ठाकरे सरकारने कितीही साळसूदपणाचा आव आणला तरीही आता ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचा खुलेआम पर्दाफाश झाला आहे. आता केवळ अनिल देशमुख यांनी राजीनामा न देता संपूर्ण ठाकरे सरकारने पायउतार व्हावे. अनिल देशमुख यांची 100 कोटींची गोष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार सर्वांना ठाऊक होती, परंतु सर्व गप्प होते, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.


परमबीर सिंहांनी काय लिहिलंय पत्रात


चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राची अशी बदनामी करणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा आजिबात अधिकार नाही. जर थोडीही लाज शिल्लक असेल तर ठाकरे सरकारने त्वरित राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या 11.5 कोटी जनतेची सार्वजनिक स्वरुपात माफी मागावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.