मुंबई : आज 21 मार्च रोजी महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. राज्यभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी परीक्षार्थी उमेदवारांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या परीक्षा देताना उमेदवारांनी काय खबरदारी घ्यावी ?  याबाबतचे परिपत्रक एमपीएससीकडून काल जाहीर करण्यात आले आहे.


 यामध्ये उमेदवारांना दोन्ही सत्रासाठी मास्क ,हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझरचे किट देण्यात येणार असून त्याचा वापर उमेदवारांनी परीक्षा देताना करायचा आहे. सोबतच ज्या उमेदवारांना सर्दी, ताप किंवा करोना संबंधित लक्षणे आढळत असतील तर संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षीय अधिकारी-कर्मचारी यांना तातडीने कळवावे लागणार आहे. अशा उमेदवारांची स्वतंत्र्य बैठक कक्षात व्यवस्था करण्यात येणार असून त्यांना पीपीई किट सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे


उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश करताना थ्री फ्लेक्स मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता व आरोग्यास हितावह वातावरण राखण्यासाठी वेळोवेळी हॅन्ड सॅनिटायजरचा वापर करावा, असं सुचनांमध्ये सांगण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा उपकेंद्रातील माहिती फलक, सांकेतिक चिन्हे याचे कटाक्षाने पालन उमेदवारांना करायचे आहे. परीक्षा दिल्यानंतर परीक्षा उपकेंद्र होऊन जाताना सुद्धा उमेदवारांनी सोशल डिस्टंसिंग काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक असणार आहे.