(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राठोडांचा राजीनामा घेणार नाहीत कारण..., नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर घणाघात
संजय राठोड यांचा राजीनामा घेणार नाहीत कारण त्यांचा राजीनामा घेतला तर आधीच्या प्रकरणावर एका मंत्र्याला राजीनामा घ्यावा लागेल अशी राणेंची टीका
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणार नाहीत कारण त्यांचा राजीनामा घेतला तर आधीच्या प्रकरणावर एका मंत्र्याला राजीनामा घ्यावा लागेल अशी टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी नारायण राणे ठाण्यात आले होते. त्यावेळी भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला.
राज्याच्या राजकारणात सद्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत असताना संजय राठोड यांच्याकडे बोट दाखवले जात असून, भाजपच्या नेत्यांनी राठोड यांच्यावर कारवाई आणि राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मुद्यावर शिवसेना अद्याप बोलायला तयार नसून वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा सरकार घेणार नाही असे भाकीत राणे यांनी केले.
राठोड यांनी राजीनामा दिला तर आधीच्या सुशांत सिंग प्रकरणात आणखी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल अशी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता राणे यांनी खरमरीत टीका केली.
मुंबईतील उर्वरीत कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करा- आदित्य ठाकरे
महाविकासआघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसून एकही आश्वासन ठाकरे सरकारने पूर्ण केले नाही. त्याचबरोबर या सरकार मधील अनेक नेत्यांवर महिला अत्याचाराचे आरोप झाले आहेत. आत्महत्या नसून ही हत्या असल्याची शक्यता राणे यांनी व्यक्त केली. तसेच हे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालत असून एकप्रकारे पाठबळ देत असल्याचे राणे यांनी सांगितले.
अधिवेशन आले की कोरोना वाढतो
राज्याच्या अर्थसंकल्प हा महत्वाचा विषय असल्यामुळे अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळण्याचे काम या सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे अधिवेशन आले की राज्यात कोरोना वाढतो का ? अशी प्रश्नार्थक टीकाही नारायण राणे यांनी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी कोरोना वाढीचे संकेत दिले होते. सरकारकडून तातडीची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती, मात्र हे अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळून टाकण्याचे काम हे सरकार करणार असल्याचे राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.