(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शरद पवारांना पंतप्रधान पद मिळाले नाही म्हणून त्यांच्या मनात वेदना! : देवेंद्र फडणवीस
शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis) खोचक टीका केली आहे. फडणवीसांनी म्हटलं की पवार यांना पंतप्रधानपद मिळाले नाही म्हणून त्यांच्या मनात वेदना आहे.
गोवा : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) हे सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गोव्यात एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खोचक टीका केली आहे. फडणवीसांनी म्हटलं आहे की, पवार साहेब मोठे आहेत त्यामुळे मोठ्यांना फार उत्तर देता येत नाहीत. मात्र आपण असेही म्हणू शकतो की शरद पवार यांना पंतप्रधान पद मिळाले नाही म्हणून त्यांच्या मनात वेदना आहे. राजकारणात असं बोलावं लागतं, असं ते म्हणाले.
त्यांनी म्हटलं की, सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे हे खरे आहे परंतु त्यासाठी आम्ही हात पाय गळून बसलो नाहीत. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही पण याच्या खूप पुढे गेलो. गेल्या दोन वर्षात मी राज्य पिंजून काढलं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काम करत आहे. पूर, वादळ, अतिवृष्टी या काळात आम्ही लोकांमध्ये आहोत. लोकांचा रोष सरकार बद्दल आहे आणि तो संघटित करण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही जनतेचे लोक आहोत आणि जनतेकरता काम करत आहोत, असं ते म्हणाले.
Sharad Pawar vs Devendra Fadnavis : शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी
येणाऱ्या निवडणुका काही मित्रांना सोबत घेऊन लढणार
आगामी निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले की, येणाऱ्या निवडणुका आम्ही आमच्या काही मित्रांना सोबत घेऊन लढणार आहोत. आता तरी मनसेबाबत कुठलीही युती झालेली नाही. बाळा नांदगावकर त्यांचे काही वैयक्तिक विषय होते त्यासाठी आले होते, असंही त्यांनी सांगितलं. फडणवीस यांनी सांगितलं की, गोव्यात चांगले काम सुरू आहे. गोव्यात आम्हाला विजय मिळेल. मागच्या वेळी कमी जागा मिळाल्या होत्या. यावेळी पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी तयारी सुरू आहे.
Navi Mumbai : 'मला वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे' : Devendra Fadnavis
या सरकारमध्ये प्रत्येक जण मुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलताना ते म्हणाले की, सरकारने यापूर्वी जी मदत घोषित केली होती तरी पोहोचली आहे का? आधी सरकारने त्या मदतीचा आढावा द्यावा. आकडेवारी फेकायची या पलीकडे हे सरकार काहीही करत नाही. शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत. या सरकारमध्ये प्रत्येक जण मुख्यमंत्री आहे जनतेची चिंता कोणालाही नाही. अनिल देशमुख यांच्याविरोधात कारवाया कोर्टाच्या आदेशानुसार सुरू आहेत. आयकर विभागाला एक हजार कोटी रुपयांच्या दलालीचे कागदपत्र सापडले आहेत. एक हजार कोटी रुपयांची दलाली होत असेल तर केंद्र सरकारने काय चुपचाप बसायचं का? असंही ते म्हणाले. हे दलाल कोण आहेत? हे कुणाचे पैसे आहेत? कुठून पैसे येतात? ते कुठे पैसे जातात ? हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. एकीकडे मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना पैसा मिळत नाही आणि दुसरीकडे हजारो कोटी रुपयांची दलाली होत आहे हे गंभीर आहे. या सगळ्या दोषींवर कारवाई व्हायला हवी ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. महाराष्ट्रात खंडणी वसुलीचे काम सुरू आहे, असं फडणवीस म्हणाले.
किरीट सोमय्या यांची विश्वासार्हता
किरीट सोमय्या यांच्याबद्दल विचारलं असता फडणवीस म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्नच नाही. किरीट सोमय्या यांच्याबद्दल लोकांच्या मनात विश्वासार्हता आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले राणे आणि गणेश नाईक भाजपात आले त्यावर तुमचं म्हणणं काय? असं विचारलं असता ते म्हणाले की, राज्य सरकारने या प्रकरणाचा पाठपुरावा करावा ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत नाहीत. आपल्यावरचे आरोप झटकण्यासाठी हे सगळे प्रकार केले जातात. आधी तुमच्यावरील आरोपांचे उत्तर द्या. हे सरकार शेतकरी विरोधी आहे, यांनी जलयुक्त शिवार बंद करून टाकलं. हे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन सांगतात पण पैसे देत नाहीत, असं ते म्हणाले.
लखीमपूर मध्ये घडलेला प्रकार गंभीर आहे. त्यावर तिथले राज्य सरकार काम करत आहे. इथे दोन हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देगलूर ध्ये आम्ही नक्कीच जिंकू हा आमचा विश्वास आहे. जनता आम्हाला साथ देईल, असंही फडणवीस म्हणाले.