(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'वळसे पाटील, तुम्ही कमिशनसाठी अडून बसला आहात!, गुन्हा दाखल करा आम्ही घाबरत नाही' : चंद्रकांत पाटील
दिलीप वळसे पाटील कसल्या केसेस दाखल करता, कुणी घाबरत नाही, तुम्ही कमिशनसाठी अडून बसला आहात. गुन्हा दाखल करा आम्ही घाबरत नाही, अनिल देशमुख अशाच धमक्या देऊन गेलेत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.
पुणे : दिलीप वळसे पाटील कसल्या केसेस दाखल करता, कुणी घाबरत नाही, तुम्ही कमिशनसाठी अडून बसला आहात. गुन्हा दाखल करा आम्ही घाबरत नाही, अनिल देशमुख अशाच धमक्या देऊन गेलेत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सरकारी कामात हस्तक्षेप केला, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं आहे. येत्या दिवसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी निर्णय घेतला जाऊ शकतो, असं वळसे पाटील म्हणाले आहेत. त्यावर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील कोविड केअर सेंटरच्या पाहणीसाठी आले होते. कोविड केअर सेंटर बाया कर्वेच्या हॉस्टेलमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी उभारले आहे.
लसींचा काळाबाजार
चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती भीषण होत चाललीय. सरकारला परिस्थिती हाताळता येत नसल्याने केंद्राकडे ढकलायचं. आम्ही पण राजकारणात माहीर आहोत. दररोज खोटं बोलताय, महाराष्ट्रात लशी जास्त आल्या, त्या वाया गेल्यात आणि काळाबाजार केला. माझा जाहीर आरोप आहे, त्याची श्वेतपत्रिका काढा, असं ते म्हणाले.
कमिशनसाठी हे सरकार अडून बसलंय
ते म्हणाले की, केंद्राने रेमडेसिवीर द्यायचं नाही असं पत्र जाहीर केलं. ते पत्र गुजरात FDA ने दिलेलं आहे. त्याबाबत ही सरकार उघडं पडलं. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर याबाबत आढावा घेत आहेत. अॅडव्हान्स देत नाहीत, यामुळे कंपन्या अडून बसल्या आहेत. आम्ही द्यायला निघालो तर त्यावर आरोप झाले. जो तयार त्याला दमबाजी केली गेली. अशा खूप केसेस दाखल करा आम्ही घाबरत नाही. वळसे पाटील सौम्य वाटले होते. त्यांनाही इंजेक्शन दिलं की ते पुढे जात आहेत. कमिशनसाठी हे सरकार अडून बसलंय, असं ते म्हणाले.
सर्व काही केंद्रावर ढकलायचं काम सुरु
ते म्हणाले की, महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती कंट्रोलच्या बाहेर आहे. सर्व काही केंद्रावर ढकलायचं काम सुरु आहे. मात्र मोदी फोन उचलत नाही असं खोटं बोलायचं. मोदी फोनववरून उद्धव ठाकरे यांना उपलब्ध झालेत, त्यानंतर ऑक्सिजनवर बैठक घेतली. उद्या जर लोक मंत्र्यांच्या, आमदारांच्या घरात घुसले तर नवल वाटायला नको. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करत आहेत, तुम्ही का लोकांशी बोलत नाही, असं पाटील म्हणाले.
ते म्हणाले की, पुण्यात येत्या आठवड्यात दोन हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध करणार आहे. हरभजन सिंग मला टेस्टिंग मोबाईल व्हॅन द्यायला तयार झालाय. लोक द्यायला तयार आहेत पण सरकार पुढे यायला तयार नाही. मंत्र्यांनी पुढे येऊन काम केलं नाहीतर लोक घरात घुसतील, असं ते म्हणाले.