आदित्य ठाकरेंच्या वरळीत 17 गाड्या, सुप्रियाताई तुमच्या ताफ्यातसुद्धा निर्भया पथकाची गाडी, मविआ सरकारला तेव्हा लाज वाटली नाही का?: चित्रा वाघ
Chitra Wagh on Nirbhaya Fund: सुप्रिया ताई तुम्ही सुद्धा निर्भया पथकाची गाडी वापरली, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.
मुंबई: महाविकास आघाडीच्या काळात निर्भया पथकातील 99 गाड्या या इतर विभागांना देण्यात आल्या, तसेच 12 वाहनं ही त्या वेळच्या मंत्र्यांच्या दिमतीला वापरण्यात आल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. तसेच निर्भया पथकातील वाहनाचा वापर खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यामध्येही करण्यात आल्याचं सांगत, ताई तुम्ही सुद्धा... तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती असा टोला त्यांनी लगावला.
महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भया पथकाचा निधी सरकारनं शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षेसाठी खर्च केल्याचा आरोप आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी केला होता. त्याला आज चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, "मविआच्या काळात निर्भया पथकासाठी 220 वाहनं खरेदी करण्यात आली होती. त्यातील 120 गाड्या या 94 पोलिस स्टेशनसाठी वापरण्यात आल्या. तर 99 वाहनं इतर विभागांना दिले गेले. त्यातील 12 वाहनं ही व्हिव्हिआयपी मंत्र्यांच्या दिमतीला देण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, सुनिल तटकरे, काँग्रेसचे सुनिल तटकरे, विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे सुभाष देसाई यांचा समावेश आहे."
Chitra Wagh on Supriya Sule: सुप्रिया ताई तुम्हीसुद्धा...
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, "निर्भया निधी आणि गाड्यांच्या वापरावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर आरोप केला होता. पण मविआच्या काळात सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यात निर्भया पथकाची गाडी वापरण्यात येत होती. ताई तुम्ही सुद्धा... तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती."
Chitra Wagh on Nirbhaya Fund: वरळीत निर्भया पथकाच्या 17 गाड्या
मविआच्या काळात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात निर्भया पथकाच्या 17 गाड्या देण्यात आल्या होत्या असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. आता आरोप करणाऱ्यांनी त्यावेळी सत्तेत असताना या गोष्टी केल्या, त्यावेळी त्यांना लाज वाटली नाही का? तुमच्या सरकारच्य मंत्र्यांनी आणि तुम्ही सुद्धा याचा फायदा घेतला असं चित्रा वाघ म्हणाल्या.
निर्भया पथकातील वाहनांचा वापर हा शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांसाठी आणि आमदारांच्या सुरक्षेसाठी केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता. त्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.