Bird flu :  गेल्या दोन-तीन दिवसांत ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता वसई विरारमध्येही बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. अर्नाळा आणि वसईतील काही भागात मागील आठवड्याभरात 800 हून अधिक कोंबड्या मरण पावल्या आहेत. त्यामुळे मयत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील केंद्रीय प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले होते. या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा पशू संवर्धन विभागाने शनिवारी जवळपास दोन ते तीन हजार कोंबड्या  मारून जमिनीत गाडल्या आहेत. वसईत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने कुकुटपालन व्यावसायिकांच्या चिंता वाढल्या आहेत.

  
 
मागील आठवडाभरापासून वसई विरार शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात शेकडो कोंबड्यांचा अज्ञात कारणाने मृत्यू होत असल्याने एकच खळबळ माजली होती. वसई-विरार मधील अर्नाळा, भंडार आळी, आगाशी ते वाघोली परिसरात तीन दिवसांत 415 हून अधिक कोंबड्या, बदके आणि टर्की कोंबड्या अचानक मयत झाल्या होत्या. 


पशु संवर्धन विभागातर्फे मयत कोंबड्यांचे नमुने पुणे वैद्यकीय शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यावेळी पुणे शाळेने कोणत्यातरी साथीच्या तापाने या कोंबड्यांच्या मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. यानंतर पुढील चाचणीसाठी भोपाळ येथील वैद्यकीय शाळेत पाठविण्यात आले. यानंतर भोपाळ वैद्यकीय शाळेने या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला असल्याचे सांगितले. यानंतर प्रशासकीय विभाग आणि जिल्हा पशू संवर्धन विभागाचे अधिकारी, पुणे वैद्यकिय शाळेचे अधिकारी असे सात समूहांसह अर्नाळा ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी बर्ड फ्ल्यूची लागण झालेल्या संपूर्ण एक किलोमीटर परिसरात शोध मोहीम सुरु केली. यावेळी अर्नाळा येथील एका कुकुटपालन व्यावसायिकाच्या 1200 कोंबड्या संशयित आढळून आल्या. शनिवारी पशू संवर्धन विभागाने अर्नाळा आणि आसपासच्या परिसरातील जवळपास दोन ते तीन हजार कोंबड्या टेंभीपाडा येथील डंपिंग ग्राउंडच्या येथे दोन खड्डे करुन गाडून टाकण्यात आल्या आहेत.    


बर्ड फ्ल्यूमुळे कुकुटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. मयत कोंबड्यात टर्की, गावठी कोंबड्या तसेच काही प्रमाणात बदकांचा समावेश आहे. असे असताना नागरिकांनी भीती बाळगू नये, तसेच घरातील कोंबड्यांना जैव सुरक्षा वातावरणात ठेवावे, कुकुटपालन व्यावसायिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.       


महत्वाच्या बातम्या