भिवंडी महापालिकेच्या कचरा डंपरची आठ जणांना धडक; दोघांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी
भिवंडी महानगरपालिकेच्या कचरा गाडीने धडक दिल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या कचरा गाडीने आठ जणांना चिरडलं आहे. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून सहाजण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चाविंद्रा हद्दीतील चमन हॉटेलसमोर मंगळवारी ही घटना घडली. अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या रामनगर ,चाविंद्रा येथील डम्पिंग ग्राऊंडवरुन कचरा खाली करुन परतणाऱ्या डंपरने हॉटेलवर चहा पीत बसलेल्या 8 मजुरांना चिरडले. यात दोघांचा मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. शब्बीर उर्फ राजू खान (40 वर्ष) आणि अहमद हारुन मोमीन (32 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तर समीम खान (45 वर्ष), रामकुमार मौर्य (40 वर्ष), साजिद अली (27 वर्ष), जमाल शेख (27 वर्ष), मझहर खान (56 वर्ष), गुफरान अंसारी (24 वर्ष) अशी जखमींची नावे आहेत.
सर्व मजूर मंगळवारी संध्याकाळी चहा पिण्यासाठी चमन हॉटेलबाहेर बाकड्यावर बसले होते. त्यावेळी महापालिकेचा कचरा वाहतूक करणारा डंपर रस्त्याने जात होता. दरम्यान डंपर चालकाचं नियंत्रण सुटल्याने डंपर थेट हॉटेलच्या समोर बाकड्यावर बसलेल्या नागरिकांना चिरडत भिंतीवर जाऊन आदळला. जखमींना ठाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, तर तीन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेनंतर डंपर चालक फरार झाला असून रात्री उशीरा याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी देखील असाच अपघात घडला होता, त्यावेळी एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला होता. तर दोन मुले गंभीर जखमी झाले होते. अशा घटना टाळण्यासाठी जबाबदार नियमित डंपर अथवा ट्रक पालिका प्रशासनाने कचरा वाहतुकीसाठी ठेवले पाहिजेत. तसेच अशा जुनाट वाहनांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी देखील कारवाई केली पाहिजे.