एक्स्प्लोर
Advertisement
भगवान गडावर ये, पण भाषण नको, नामदेवशास्त्रींची पंकजा मुंडेंना अट
मुंबई : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर यावं मात्र त्यांनी भाषण करु नये, अशी अट महंत नामदेवशास्त्री महाराज यांनी घातली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरुन पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात बीड-नगर सीमेवर भगवान गड आहे.
पंकजा मुंडे यांनी कालच आपण भगवान गडावर जाणार असल्याची पोस्ट फेसबुकवर अपलोड केली होती. त्याबाबतची प्रतिक्रिया नामदेव शास्त्री यांनी दिली.
सामान्य भक्ताप्रमाणे यावं
नामदेवशास्त्री म्हणाले, "पंकजा मुंडेंनी सामान्य भक्ताप्रमाणे गडावर यावं, त्यांना कोणीही रोखणार नाही. हे मंदिर आहे, इथे येण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही. मात्र हा धार्मिक ट्रस्ट आहे. ट्रस्टने निर्णय घेतल्याप्रमाणे इथे भाषण होणार नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंनी इथे भाषण करु नये".
भगवान गड श्रद्धेचा, गोपीनाथ गड राजकीय
"भगवान गड हा श्रद्धेचा गड राहिल, तर गोपीनाथ गड हा राजकीय गड राहील हे पंकजाने म्हटलं होतं. भगवान गडाचं स्वतंत्र अस्तित्व आहे. हा गड 1951 पासून सुरु झाला आहे. गोपीनाथराव 1993-94 पासून बोलत होते. मात्र त्याचा अर्थ असा नाही की त्यांची परंपरा ट्रस्टमध्ये कायम राहावी. पंकजांनी त्यांच्या अस्तित्वासाठी गोपीनाथ गड निर्माण केला आहे. मग त्यांचा भगवान गड या धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी भाषणाचा आग्रह का", असा सवाल नामदेव शास्त्रींनी विचारला आहे.
बापाच्या घरी येण्यास परवानगी कशाला?
पंकजाला मुलगी म्हणून स्वीकारलंय, मग बापाच्या घरी येण्यासाठी परवानगीची काय गरज? असा सवालही नामदेव शास्त्री महाराज यांनी विचारला आहे.
भगवान गडावरील दसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडे भाषण करत होते. त्यांच्या नंतर आता पंकजा मुंडेंनीही ती परंपरा चालू ठेवावी, अशी वंजारी सेवा संघाची भावना आहे. मात्र त्याला नामदेव शास्त्रींचा विरोध आहे.
यावर्षीच आडकाठी का?
12 डिसेंबरला मी गोपीनाथ गडावरुन जाहीर केलं होतं, की यावर्षीपासून भगवानगडावर राजकीय भाषण होणार नाही. जिथं तुमचं अस्तित्व निर्माण झालं, तिथेच मी जाहीर सांगितलं की इथून पुढे भाषण होणार नाही. मग आज हा प्रश्न का? गोपीनाथ मुंडेंना भगवानगडाने आधार दिला, ही चूक केली का गडाने? असं नामदेवशास्त्री म्हणाले.
तो ठराव ग्रामसभेचा नाही
पंकजांच्या भाषणासाठी दोन-तीनशे ग्रामसभांनी ठराव केल्याचं सांगितलं जातं. मात्र ते ठराव ग्रामसभांनी नाही तर सरपंचांनी केले आहेत. ज्यावेळी ते लोक निवदेन देण्यास आले होते, त्यावेळी त्यांना भक्तांनी रोखलं होतं. माझं मत आहे की भक्तांचा मान पंकजांनी ठेवला पाहिजे. भक्त विरोध करत आहेत हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असं नामदेवशास्त्री म्हणाले.
राजकीय लाभासाठी स्टंट
येत्या काळात जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुका होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर राजकीय लाभासाठी अनेकांनी केलेली ही स्टंटबाजी आहे. त्यामुळेच खोटे ठराव केल्याचा दावा नामदेव शास्त्रींनी केला.
..तर पंकजाशी बोलेन
तुम्ही याबाबत पंकजा ताईंशी संपर्क साधणार का? असा प्रश्न नामदेवशास्त्रींना विचारण्यात आला. त्यावर नामदेवशास्त्री म्हणाले, "ती जर माझ्याशी बोलत असेल, तर मला काय हरकत आहे? ती माझी मुलगीच आहे"
पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट
पंकजा मुंडे यांनी भगवान गडाबाबत फेसबुक पोस्ट अपलोड केली. "हो मी येणार दसऱ्याला तुमच्यासाठी, आपल्यासाठी भगवान गडाची कन्या म्हणून भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी... आणि तुम्ही? तुम्ही येणार ना?" असं पंकजा यांनी म्हटलं आहे.
भगवान गडाचा वाद नेमका काय?
भगवान गडावरील दसरा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरण होतं. गोपीनाथ मुंडे यांचं दसरा मेळाव्याला भगवान गडावरुन भाषण होत असे. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर भगवान गडावर राजकीय भाषण होणार नाही, अशी भूमिका भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली. त्याला वंजारी सेवा संघानं विरोध करत आक्रमक भूमिका घेतली. गेल्या वर्षी भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत झाला होता.
मात्र, गेल्या काही दिवसात नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद सुरु झाले. त्यानंतर या गडावरुन राजकीय भाषण होणार नाही, अशी भूमिका नामदेवशास्त्रींनी घेतली.
गोपीनाथ गडावरुन भाषण करावं
भगवानगडावरुन राजकीय भाषण करु नये असं सांगत नामदेव शास्त्री म्हणाले, "पंकजा मुंडेंनी गोपीनाथगड उभा केला आहे. त्याठिकाणी त्यांनी राजकीय भाषण करावं".
वंजारी संघाचा इशारा
भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्येच झाला पाहिजे, नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा वंजारी सेवा संघाच्या वतीनं देण्यात आला होता. तर दुसरीकडे पंकजा मुंडेचे येथे भाषण होणार नाही, अशी भूमिका गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली होती.
संबंधित बातमी
दसऱ्याला भगवान गडावर येणारच: पंकजा मुंडे महंत नामदेव शास्त्रींवर जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा भगवानगडावर राडा, नामदेव शास्त्री-पंकजा मुंडे समर्थक भिडले भगवानगड दसरा मेळावा वादः नामदेव शास्त्रींचं मुख्यमंत्र्यांना पत्रअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement