Coronavirus | पोलीस बाप ड्युटीवर, नवजात बाळाचं लांबूनच दर्शन, खबरदारीसाठी कुशीतही घेऊ शकत नाही!
22 दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळाला पोलीस बाप स्पर्श सुद्धा करु शकलेला नाही. ही कहाणी आहे बीडमधील पोलीस कॉन्स्टेबल नितीन काकडे यांची...
बीड : कोरोनामुळे माणसामाणसातील सोशल डिस्टन्सिंग वाढलंय पण त्याच वेळी आपल्या पोटच्या गोळ्यापासून सुद्धा दूर राहण्याची वेळ काही जणांवर आली आहे. ही कहाणी आहे बीडमधल्या एका पोलीस बापाची, ज्याला एक महिन्यापूर्वी जन्मलेल्या आपल्या गोंडस बाळाला साधा स्पर्श सुद्धा करता येत नाही.
रस्त्यावर लोकांनी गर्दी करु नये यासाठी आपले कर्तव्य चोख बजावणार्या पोलीस शिपाई नितीन काकडे यांचं हे रोजचं काम. दिवसभर ड्युटी केल्यानंतर वेळ मिळला तर ते सासरी एक चक्कर मारतात. घराबाहेरुनच आपल्या 22 दिवसांच्या गोंडस बाळाला पाहतात आणि जड पावलांनी तिथून निरोप घेतात.
नितीन काकडे यांच्या पत्नी रेणुका याही पोलीस आहेत. बाळंतपणासाठी त्या माहेर गेल्यात आहेत. हे त्यांचं दुसरं बाळंतपण. त्यांचा पहिला मुलगा राजवीर पाच वर्षांचा आहे. पण त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता येत नाही की जेव्हापासून आपल्या घरात बाळ आलंय तेव्हापासून बाबा कधीच घरामध्ये का आला नाही. राजवीरला कोरोना काय असतो हे माहित नाही पण या कोरोनामुळे त्याचे बाबा घरात येत नाही हे मात्र त्याला माहित आहे.
इतर पोलिसांप्रमाणे बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या नितीन काकडे यांनीही मागच्या एक महिन्यापासून स्वतःला कुटुंबापासून वेगळे ठेवले आहे. कायम रस्त्यावरची ड्युटी असल्याने ते कुटुंबातील इतर कुणाजवळ सुद्धा जात नाहीत.
लॉकडाऊन कधी संपेल, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कधी कमी होईल आणि कधी एकदा आपण मुक्त होऊ असं तुम्हा-आम्हाला प्रत्येकालाच झालं आहे. पण रस्त्यावर फिरण्याआधी या पोलिसाच्या वर्दीतल्या बापाचा निश्चित विचार करा जो तुमच्या-आमच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभा आहे, जो मागच्या महिन्याभरापासून आपल्या गोंडस बाळाला साधा हात सुद्धा लावू शकलेला नाही.