बीड : बीडमध्ये प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करुन पेटवून देणाऱ्या आरोपीला पोलिसांना काही तासात अटक केली आहे. पीडित तरुणीचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आरोपी अविनाश राजुरेला अटक केली आहे. प्रेयसीला जाळल्यानंतर आरोपी अविनाश राजुरे फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा केला होता, अखेर नांदेड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती.


तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करुन नंतर तिला जिवंत जाळण्याच्या बीडमधील घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला कोणत्याही स्थितीत कडक शिक्षा व्हावी यासाठी 'फास्ट ट्रॅक कोर्टा'त खटला चालवण्यासंदर्भात सूचना केली आहे. या प्रकरणी मी स्वतः लक्ष ठेवून आहे, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं.


काय आहे प्रकरण?

बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात 22 वर्षीय प्रेयसीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न प्रियकरांनं केला होता. पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं होतं. परंतु, उपचारा दरम्यान या पीडित तरूणीचा मृत्यू झाला आहे.

पीडित तरुणी शेळगावातीलच अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघेही दिवाळीनिमित्त पुण्याहुन दुचाकीवरून गावी परतत होते. गावी परतत असताना पहाटे 3 च्या दरम्यान बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवली. त्यानंतर या तरूणाने तरुणीवर अॅसिड टाकले. त्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तरूणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. त्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला.

घटना घडल्यानंतर जवळपास 12 तास तरूणी रस्त्याच्या बाजूच्या खड्यात तडफडत होती. त्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पाहिलं. त्यावेळी पीडित तरूणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर संबंधित लोकांनी त्वरित पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, तरुणीला रुग्णालयात दाखल केलं होतं.

इतर बातम्या