बीड : बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 22 वर्षीय प्रेयसीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्यात आलं आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडालीय. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती. घटनेनंतर आरोपी मात्र फरार आहे.


बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात ही घटना घडली. सावित्रा (वय 22) असं पीडित तरूणीचं नाव आहे. ती शेळगावातीलच अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघेही पुण्याहुन दुचाकीवरून गावी परतत होते.


गावी परतत असताना पहाटे 3 च्या दरम्यान बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवली. त्यानंतर या तरूणाने तरुणीवर अॅसिड टाकले. त्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तरूणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं.  त्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला.


घटना घडल्यानंतर जवळपास 12 तास तरूणी रस्त्याच्या बाजूच्या खड्यात तडफडत होती. त्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पाहिलं. त्यावेळी पीडित तरूणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर संबंधित लोकांनी त्वरित पोलिसांना घटनेची माहिती दिली.  पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत. तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. तसेच सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


दरम्यान पीडितेचे 48 टक्के टक्के शरीर भाजले असून प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, ऐन दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या थरारक प्रकारामुळे माणुसकी जिवंत आहे का ? असा प्रश्न निर्माण झालाय. तसेच परिसरात खळबळ माजली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :