सोलापूर : आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या आईचा मुलीनेच काटा काढल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. सोलापुरातील कुमठे येथील महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई माने (वय 40) यांचा मृतदेह 8 नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरात आढळून आला होता. लक्ष्मीबाई माने ह्या गेल्या काही वर्षांपासून एकट्याच घरात राहत होत्या. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिस स्थानकातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मृतदेहाच्या गळ्यावरील निशाणावरुन गळा दाबून खून केल्याचा संशय पोलिसांना आला.


नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अतिप्रसंग करतानाचे व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करणाऱ्याला बेड्या


यावरुन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सुरुवातील मृत महिलेचा एक सावत्र भाऊ असलेल्या व्यक्तीवर पोलिसांना संशय आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता मृत महिलेची मुलगी आईला भेटण्यासाठी आली होती, अशी माहिती त्याने दिली. त्यावरुन पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. मृत लक्ष्मीबाई माने यांची मुलगी अनिता जाधव लग्नानंतर कनार्टकातील विजयपूर येथील तोरवी गावात वास्तव्यास होती. पोलिसांनी तात्काळ तपास पथके विजयपूरसाठी रवाना केली. यावेळी संशयित अनिता हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.


सासरवाडीत मोबाईल हरवल्याच्या वादातून पत्नीला फासावर लटकावलं! 


आरोपी अनिता जाधव हिचे आपल्या दिरासोबत अनैतिक संबंध होते. या संबधास लक्ष्मीबाई यांनी विरोध केला. आपल्या मुलीला त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, मुलगी ऐकत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रखरपणे विरोध करायला सुरुवात केली. याचाच राग मनात धरुन अनिता हिने आपल्या प्रियकरासोबत संगणमत करुन आईचा खून केला. तोंडात टॉवेल कोंबून गळा आवळून हत्या केलाची प्राथमिक माहिती चौकशीत समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी मुलगी अनिता महादेव जाधव आणि शिवानंद भिमप्पा जाधव या दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुन्हा नोंद झाल्याच्या अवघ्या दोनच दिवसात पोलिसांनी हत्येचा छडा लावला आहे. विजापूर नाका पोलिस स्थानकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.