रांचीः झारखंडमधील चतरामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. मोबाईल हरवल्याच्या कारणावरुन पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणानंतर ही दुर्देवी घटना घडली. माहितीनुसार मोबाईल फोन हरवल्यामुळं नाराज झालेल्या या व्यक्तिनं आपल्या पत्नीची घरातच फासावर लटकावत हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपी उमेश भुईया याला अटक करण्यात आली आहे.


चतराचे पोलिस अधिकारी अविनाश कुमार यांनी सांगितलं की, सासरवाडीमध्ये मोबाईल फोन हरवल्याच्या वादातून उमेश भुइया यानं रागात आपली पत्नी डॉली देवीला फासावर लटकावलं. ही घटना चतरा सदर ठाणे क्षेत्रात हासबो या गावात घडली. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. मृत डॉलीदेवीचं शव ताब्यात घेत पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवलं आहे. घटनेनंतर आरोपी उमेशला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.


सासरवाडीत हरवला फोन
अविनाश कुमार यांनी सांगितलं की, दोन दिवसांपूर्वी आरोप उमेश भुईया आपल्या सासरवाडीला गेला होता. तिथं त्याचा मोबाईल हरवला. दुसऱ्या दिवशी आपल्या घरी आल्यावर त्याचं आणि पत्नी डॉलीचं कडाक्याचं भांडण झालं. या भांडणाच्या रागात आरोपी उमेशनं डॉलीला घरातच फासावर लटकावलं.  पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.