Beed Accident:ST बसने उडवले, पोलीस भरतीची तयारी करणारे 3 तरुण जागीच ठार, बीड- परळी महामार्गावर भीषण अपघात
एसटी बसने तीन तरुणांना उडवले. पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या 3 तरुणांचा यात जागीच मृत्यू झाला आहे.
Beed Accident: बीड परळी मार्गावर भीषण अपघात झाला आहे. पहाटे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या तरुणांना आज सकाळी (19 जानेवारी) भरधाव एसटी बसने चिरडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिघेही तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. बालाजी मोरे, ओम घोडके, आणि विराज घोडके अशी मृत तरुणांची नावे आहेत. पोलीस भरती करणाऱ्या 3 तरुणांच्या अपघातामुळे गावकरीही हळहळले आहेत. सिमेंटच्या रस्त्यावरून बस खाली सरकल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे.
पोलीस भरती करणारे 3 तरुण जागीच ठार
राज्यात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असून कधी चालकाच्या चुकीने, रस्त्याच्या खराबीमुळे, तर आणखी कोणत्या कारणाने अपघात वाढतच आहेत. बीड परळी महामार्गावर रविवारी सकाळच्या सुमारास एसटी बसने तीन तरुणांना उडवले. पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या 3 तरुणांचा यात जागीच मृत्यू झाला आहे. हे तरुण नेहमीप्रमाणे पहाटे व्यायाम करण्यासाठी जात होते. यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने तरुणांना धडक दिली. घोडका राजुरी जवळ झालेल्याया या अपघातात 3 तरुणांचा चिरडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तरुणांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या तरुणांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती कळताच या तरुणांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरु आहे. परळी महामार्गावर झालेल्या अपघातात बस सिमेंटच्या रस्त्यावरून खाली घसरली असून बसचा मागच्या काचा फुटल्या आहेत. या बसमध्ये प्रवासी होते का याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नसून नेमका कशाने अपघात झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.
राज्यात अपघातांची संख्या वाढली
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अपघाताचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. कधी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तर कधी रस्त्यावरील खड्डे, वाहनांचे विचित्र अपघात अशा अनेक कारणांमुळे होणारे अपघात वाढले आहेत. महामार्ग वाहतूक पोलीसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत राज्यात विविध कारणांनी होणाऱ्या अपघातांची संख्या 32,801 एवढी आहे. यात 13,823 जण जागीच दगावले आहेत. वाढत्या अपघातांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकार आता तरी काही ठोस पावलं उचलणार आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.