(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नातेवाईकांची आर्त हाक ऐकून सरणावर ठेवतानाच आजीने उघडले डोळे, आणि....
अंत्यसंस्कारासाठी सरणावर ठेवत असताना अचानक आजीने डोळे उघडले आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला होता.
बारामती : बारामती तालुक्यातील मुढाळे गावातील 76 वार्षीय आजी शकुंतला गायकवाड यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी सरणावर ठेवत असताना अचानक आजीने डोळे उघडले आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला होता. त्यांनंतर शकुंतला आजींना तात्काळ बारामतीतील सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु दुसऱ्याच दिवशी आजीची प्राण ज्योत मालवली.
त्याचं झालं असं, बारामती तालुक्यातल्या मुढाळे गावात 25 दिवसांपूर्वी एका 76 वर्षीय आजीबाईंना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यामुळे आजीबाई घरातच विलगीकरणात होत्या. वृद्धापकाळामुळे शरीर प्रकृती साथ देत नव्हती. हालचाल करता येत नव्हती. त्यामुळे घरातील सदस्यांनाही आजीबाईंची सेवा कशी करावी, याबाबत कोडे पडले होते. संपर्कात जावे तर कोरोनाची बाधा होण्याची भिती नातेवाईकांनी होती. त्यामुळे थोडे अंतर राखून सेवा चालू होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती अधिक खालावली.
आजीबाई डोळेसुद्धा उघडत नाहीत, हे पाहून घरातल्या सदस्यांनी त्यांना उपचारासाठी बारामतीला दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. गाडी घेऊन जाताना आजीबाईंनी काहीच प्रतिसाद दिला नाही. दवाखान्यात ऍडमिट करावे; तर बेड शिल्लक नाहीत. अशा परिस्थितीत आजीबाई निपचित पडून राहिल्यामुळे गाडीतल्या सदस्यांना वाटले आजीचं निधन झालं. तेथूनच पाहुण्यांना फोन केले. निधन वार्ता कळवली. गाडी घरी आली आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरु झाली.
कोरोनाबाधित असल्यामुळे फार कोणी जवळ गेलं नाही. तिरडीवर ठेवल्यानंतर मुखाग्नी देण्याची तयारी सुरु होती. मात्र, आजूबाजूला नातेवाइकांची आर्त हाक ऐकून आजीबाईंनी अचानक डोळे उघडले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कोरोनाशी गेल्या अनेक दिवसांपासून झुंज देत असलेल्या आजी जिवंत असल्याची घटना सर्वांना कळवली. नातेवाईकांना या आश्चर्यकारक घटनेमुळे आनंद तर झालाच, पण आजीला जिवंतपणीच मरण यातना दिल्याने मनस्ताप देखील झाला.
लागलीच आजीला घरच्यांनी आजीला शासकीय रुग्णालयात दाखल केल परंतु दुसऱ्याच दिवशी आजीची प्राणज्योत मालवली. कोरोनाच्या संसर्गामुळे एकमेकांना स्पर्श करणे धोक्याचं ठरत असल्याची भावना आपल्या प्रियजनांना एकमेकांपासून दूर करत आहे. कोरोना संसर्गामुळ मृत झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक देखील पुढे येत नाहीत. कोणी तयारी दाखवलीच तर लवकर अंत्यसंस्कार करून मोकळे व्हावं, अशा विचारातून आजीबाईंबाबत घाई अंगलट आली असती. त्यातून आजी वाचल्या परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टर सदानंद काळेंनी दिली.