(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरात-राधाकृष्ण विखेंमध्ये पुन्हा संघर्षाची चिन्हे
अहमदनगरमध्ये बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही नेते एकमेकांच्या समोर आले होते.
शिर्डी : लोकसभा निवडणूक निकालानंतर आता बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे-पाटील वाद आता सुरु झाल्याचं दिसत आहे. बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरात सुजय विखे-पाटलांच्या अभिनंदनाचे लावलेले बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. दोषींवर कारवाई करा अशी मागणी करत आज युतीच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर येथे महामार्ग काही काळ अडवून धरला.
भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन सुजय विखे अहमदनगर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयी झाले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात उडी घेतली होती. तर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रान पेटवले होते.
मात्र विखे-पाटलांनी थोरातांना शह देत त्यांच्याच संगमनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला आघाडी मिळवून दिली आणि अहमदनगर, शिर्डीची जागा युतीच्या पारड्यात टाकली. सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर संगमनेर शहरासह घुलेवाडी येथे लावण्यात आले होते. मात्र हे बॅनर रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फाडले आहेत. यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे तर युतीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. संतप्त झालेल्या युतीच्या कार्यकर्त्यांनी घुलेवाडी येथे नाशिक-पुणे महामार्ग काही काळ अडवून धरला होता. पोलिसांनी दोषींवर ठोस कारवाई करण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं..