एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छोटा भाऊ युतीसाठी तयार, अजूनही वेळ गेलेली नाही : नांदगावकर
मुंबई : छोटा भाऊ म्हणून मनसे युतीसाठी तयार आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने युतीच्या प्रस्तावाचा विचार करावा, अशा भावना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केल्या आहेत. मुंबईच्या हितासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी आपली इच्छा असल्याचंही नांदगावकरांनी सांगितलं.
विनाशर्त युतीचा प्रस्ताव
मराठी माणसांसाठी दोन भावांनी एकत्र यावं, अशी आपली इच्छा असल्याची भावना बाळा नांदगावकरांनी व्यक्त केली. मुंबईचं भलं व्हावं यासाठी आपण करत असलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मनसेकडून युतीसाठी कुठलीही अट नव्हती. आम्हाला या ठिकाणी मदत करा, या जागा सोडा, अशी कुठलीही मागणी नव्हती. लहान भाऊ म्हणून ज्या जागा द्याल, त्या मान्य असतील, असा प्रस्ताव दिल्याचं नांदगावकर
म्हणाले.
मुंबईच्या हितासाठी एकत्र यावं
मुंबईच्या हितासाठी दोघांनी एकत्र यावं, अशी आपली इच्छा आहे. राष्ट्रीय पक्षांना राज्याच्या अस्मितेबाबत काहीही पडलेलं नसतं. मात्र मराठी माणसांनी, हक्काच्या माणसांनी एकत्र यावं, अशी आपली भावना असल्याचं नांदगावकरांनी स्पष्ट केलं. मला कोणतीही प्रसिद्धी नको होती, हे कुटुंबातलं प्रकरण होतं, प्रसारमाध्यमांना सांगायचंच असतं, तर ढोल बडवत गेलो असतो, असंही नांदगावकर म्हणाले.
युतीचा फायदा शिवसेनेलाच
युती झाली असती तर शिवसेनेलाच फायदा झाला असता, असं आपलं ठाम मत असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. राज यांनी सात वेळा फोन केले, तीन वेळा तर माझ्या समोरच केले. राज ठाकरेंची भावना मला समजली, त्यामुळे मी युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेलो. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेना विचार करु शकते, असं आवाहनही नांदगावकरांनी केलं.
आमची तयारी पूर्ण
आमची तयारी पूर्ण आहे, एबी फॉर्म, उमेदवार यादीचं काम अंतिम टप्प्यात आहे, मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं ही शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्याप्रमाणे सामान्य नागरिकांचीही भावना आहे, याच प्रांजळ भावनेने मी गेलो होतो, असं नांदगावकरांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे मातोश्रीवर गेले असते
राज ठाकरे स्वतः फोन करत होते, म्हणजे वेळ पडल्यास राजसाहेब मातोश्रीवर गेले असते, अशी खात्री बाळा नांदगावकरांनी व्यक्त केली. मनसेची परिस्थिती आणखी काय वाईट होणार, अशी कळकळ व्यक्त करतानाच मुंबईच्या हितासाठी दोन पावलं मागे जाण्यास मनसे तयार असल्याचंही नांदगावकरांनी स्पष्ट केलं.
तर मीच खोटं बोलत असेन...
लहान भाऊ म्हणून मनसे शिवसेनेसोबत युती करण्यासाठी तयार आहे. आमच्या प्रस्तावाचा सन्मान राखा, त्याबाबत विचार करा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडे केल्याचं बाळा नांदगावकरांनी सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे जर कोणताच प्रस्ताव आला नसल्याचं सांगत असतील, तर मीच खोटं बोलत असेन, असं नांदगावकर म्हणाले.
रविवारी संध्याकाळी मातोश्रीवर गेलो होतो. त्यावेळी अनिल देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर या नेत्यांकडे आपण युतीचा प्रस्ताव ठेवला. आपला निरोप उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवण्याचं आश्वासन सर्व नेत्यांनी दिलं. मिलिंद नार्वेकरांनी आपल्याला सन्मानाने आत आणलं आणि जाताना बाहेरपर्यंतही सोडलं, मात्र उद्धव ठाकरे जर कुठलाच प्रस्ताव आला नसल्याचं म्हणत असतील, तर
कदाचित मीच खोटं बोलत असेन, असं नांदगावकर हतबलपणे म्हणाले.
मनसेच्या प्रस्तावाबाबत उद्धव ठाकरे खोटं बोलले?
मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही, पण कदाचित मी मातोश्रीवर गेलोच नसेन, मला शिवसेनेचे कोणतेही नेते भेटलेच नसतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. उद्धव ठाकरे काय बोललो ते माहित नाही, त्यांनी युतीसाठी कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं सांगितल्याचं मला प्रसारमाध्यमांतूनच समजलं. त्यामुळे मी संध्याकाळपर्यंत उत्तराची वाट बघत होतो, असंही नांदगावकर म्हणाले. सुभाष देसाईंनी चर्चेला बसून मार्ग काढू, असं आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलं. 'तुम्ही सांगाल तेव्हा राज ठाकरे आणि मी मातोश्रीवर चर्चेला येऊ, असा प्रस्ताव मी देसाईंसमोर ठेवला. याबाबत राज ठाकरेंना सांगितलं असता, त्यांनी मला काय प्रस्ताव दिलास, याची माहिती दे' असं सांगितल्याचंही नांदगावकर म्हणाले. उद्धव ठाकरे भेटले असते तर... उद्धव ठाकरे घरीच होते, मात्र मी लहान कार्यकर्ता आहे, माझी भेट त्यांच्याशी होऊ शकली नाही, असंही बाळा नांदगावकरांनी सांगितलं. मातोश्रीवर जाणं माझ्यासाठी भाग्याचं होतं. उद्धव ठाकरे भेटले असते, तर बरं झालं असतं. उद्धव ठाकरे चांगला माणूस आहे, ते भेटले असते तर कदाचित वेगळी परिस्थिती असती, अशा भावनाही नांदगावकरांनी व्यक्त केल्या. मन मला खात राहिलं असतं मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर आपण युतीसाठी हात पुढे केल्याचं नांदगावकरांनी सांगितलं. शिवसेना आणि भाजपमध्ये काही आलबेल नाही, त्यांनी एकमेकांची औकात काढली, त्यामुळे मराठी माणूस म्हणून मला चीड आली, असंही नांदगावकर म्हणाले. मी गेलो नसतो, तर माझं मन मला खात राहिलं असतं, अशी कबुलीही त्यांनी दिली. इतर कोणाशी युतीची शक्यता नाही मनसेकडून इतर पक्षांना युतीचा प्रस्ताव जाण्याची शक्यता आपल्याला दिसत नाही. मात्र त्याबाबत आपण कोणतेही भाष्य करणं चुकीचं आहे, राज ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असं बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलं. फडणवीसांना एसएमएस केला देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, भाजपचे नाहीत. त्यामुळे मुंबई प्रश्नी त्यांच्याशी भेट होतेच. परवा भाषणानंतर मी त्यांना एसएमएस केला, जरा नॉर्मल बोला, किती ओरडता, माझंही गळ्याचं ऑपरेशन झालं आहे, कमी आवाजात बोला, टेक केअर, असा एसएमएस देवेंद्र फडणवीसांना केल्याचं नांदगावकरांनी सांगितलं. त्यावर 'होय बाळासाहेब' असा रिप्लायही त्यांनी दिल्याचं नांदगावकर म्हणाले.युतीसाठी मनसेने दिलेली टाळी उद्धव ठाकरेंनी झिडकारली
युतीसाठी कुठल्याही पक्षाकडून प्रस्ताव आलेला नाही, कोणाशीही युती करण्याचा विचार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेना-मनसे युतीच्या शक्यता फेटाळून लावल्या. दहा महापालिका आणि सर्व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. आम्ही पूर्ण सामर्थ्याने मैदानात उतरत आहोत, असं सांगत संपूर्ण महाराष्ट्र भगवा करण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सेना-मनसे एकत्र येण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. शिवसेनेची उमेदवार यादी अंतिम टप्प्यात आहे, त्यावर बैठकांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यामुळे पुन्हा युतीच्या प्रस्तावावर नव्याने बोलणी करण्याची शिवसेनेची तयारी नसल्याचं बोललं जात आहे.संबंधित बातम्या :
मनसेसोबत युती अशक्य, शिवसेनेच्या सूत्रांची माहिती
..तर राज ठाकरे स्वत: ‘मातोश्री’वर जाणार?
दोन्ही ठाकरे बंधू फार काळ वेगळे राहू शकत नाही: विखे-पाटील
राज ठाकरेंचा निरोप घेऊन बाळा नांदगावकर ‘मातोश्री’वर
राज-उद्धव एकत्र आल्यास इतिहास घडेल, मनोहर जोशींना विश्वास
मनसेच्या प्रस्तावाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील : राऊत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement