''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य''
मी काल बदलापूरला गेले होते, याप्रकरणी पोलिस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर, पीडित कुटुंबीयांशी देखील भेटून चर्चा केल्याचं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं
![''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य'' Badlapur School update Even a person like Kasab is hanged according to the law so it is impossible to hang even the of Badlapur criminal within 24 hours says neelam gorhe ''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य''](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/21/5570c07436cd60d56853999dc459ca8917242283461041002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बदलापुरातील चिमुकल्या मुलीवर झालेल्या घटनेनं महाराष्ट्र हादरला असून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. बदलापुरात आंदोलक मोठ्या संख्येने रेल्वे ट्रॅकवर उतरले होते, त्यामुळे पोलिसांनी कितीही समजूत काढून ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांनीही बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी आरोपीला फाशी द्या, असा पवित्र कायम घेतला होता. अखेर, पोलीस बळाचा वापर करुन आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरुन बाजूला करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे शिक्षणंमत्री दीपक केसरकर आणि विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही बदलापुरात जाऊन पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच, पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्याही भेट घेतली. त्यानंतर, आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी बदलापूर घटनेतील आरोपीला अधिकाधिक शिक्षा व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे, पण आपण लोकशाहीत राहतो, असे म्हटले.
मी काल बदलापूरला गेले होते, याप्रकरणी पोलिस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर, पीडित कुटुंबीयांशी देखील भेटून चर्चा केल्याचं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं. तसेच, असं घृणास्पद कृत्य करणारा व्यक्ती असतो, त्याला अधिकाधिक शिक्षा व्हावी अशी सर्वांची इच्छा असते. मात्र, आपण लोकशाहीमध्ये राहातो, कसाबसारख्या दहशतवाद्याची ट्रायल घेत त्याला कायद्यानव्ये शिक्षा दिली गेली. त्यामुळे, तिथल्या तिथे फाशी देण्याची मागणी करणं आणि नेत्यांनी देखील 24 तासांत फाशी द्या म्हणणं चुकीचं आहे, असेही निलम गोऱ्हे यांनी म्हटलं.
नियमांचे पालन होत नाही
मुख्याध्यापकांनी जी दिरंगाई केली, पोलिसांकडून दिरंगाई झाली असं लोकांचे म्हणणे आहे. मुली घाबरुन जातील त्यांना या आघातातून सावरता येईल त्याबाबत बोलून त्यांना हादऱ्यातून वेळ दिला पाहिजे. पालकांच्या सूचना आहेत, त्याप्रकरणी कायदा आहे. याप्रकरणी पालक आणि शिक्षक संघ असला पाहिजे, मात्र याप्रकरणी नियमांचे पालन होत नाही, असंचं दिसून येत असल्याचही निलम गोऱ्हे यांनी म्हटलं. सीसीटीव्ही बंद होते, स्वच्छता रक्षक म्हणून पुरुष नेमलेला आहे, संस्थाचालक याकडे दुर्लक्ष करत असतील तर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. याप्रकरणी मी स्वत: दखल घेणार आहे, मी रात्री पोहोचले तेव्हा मॉब विखुरलेला होता. संवाद साधण्याचा प्रयत्न लोकांसोबत केला, नंतर ही परिस्थिती हाताळण्यात आल्याची माहितीही गोऱ्हे यांनी दिली.
पोक्सोच्या नियमावलीत बदलाची गरज
पॉक्सोमध्ये जे नियम लावले जातात, याप्रकरणी 3-4 वर्षाची मुलगी कशी बोलू शकते, 7-8 वर्षांची मुलगी वेगळी बोलेल, 15-16 वर्षांची मुलगी वेगळी बोलेल. याप्रकरणी संवेदनशील एसओपी असली पाहिजे, प्रश्न काय विचारले पाहिजे आणि काय नाही विचारले पाहिजे. स्वत: मुख्यमंत्र्यांना पत्र देत याप्रकरणी पॉक्सोची नियमावली कडक केली पाहिजे. पॉक्सोची नियमावली लोकांच्या दृष्टीनं फ्रेंडली व्हायला पाहिजे. आयोगाच्या लोकांनी सरकारची गाडी वापरण्याऐवजी कुटुंबीयांकडे जाताना खासगी गाडी वापरायला हवी, जेणेकरुन आजूबाजूच्या लोकांना कळलं नाही पाहिजे, नेमकं काय झालंय, असे म्हणत निलम गोऱ्हे यांनी पोक्सोच्या नियमावलीत बदल करण्याचेही सूचवले आहे.
संजय राऊतांचा स्क्रू ढीला झालाय
दरम्यान, नेमकं किती वर्ष न्यायालयीन प्रक्रिया चालावी हे देखील निश्चित झालं पाहिजे. मी सोमवारी २६ तारखेला बैठक घेत आहे, ज्यात परिवहन विभाग, शिक्षण विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, आदिवासी विभाग आणि सोबतच पालक संघटना हे असतील. आंदोलकांकडून एक गोष्ट समोर येते, लाडकी बहीण नको न्याय पाहिजे. पण, लाडकी बहीण योजना नको हे म्हणणं चुकीचं आहे. जरी तुम्हाला न्यायाची गरज, तशीच त्यांना देखील न्यायाची गरज. खासदार संजय राऊत म्हणाले, ज्याप्रकारे लोकशाहीत हे सरकार आलं तो लोकशाहीवरील बलात्कार आहे. मात्र, संख्याबळावर हे सरकार आलंय, संजय राऊत यांच्या डोक्याचा स्क्रू ढिल्ला झालाय, असा शब्दात निलम गोऱ्हे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. तसेच, राजकीय फायदा घेण्याचा देखील प्रयत्न यातून होताना दिसत आहे, असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा
मोठी बातमी ! सरकारी नोकरीत येणाऱ्या दिव्यांग उमेदवारांची होणार तपासणी; शासन निर्णय जारी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)