Uddhav Thackeray Meeting: औरंगाबादच्या सभेत 'संभाजीनगर'ची घोषणा होणार?
गेल्या अनके वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी होत आहे.
Aurangabad City Renaming: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 8 जूनला औरंगाबाद शहरात होणारी जाहीर सभा अनेक कारणांनी चर्चेत आली आहे. त्यात सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे औरंगाबाद शहराच्या नामांतराची. कारण याच सभेत उद्धव ठाकरे औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची अधिकृतरीत्या घोषणा करणार का ? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.
8 तारखेला होणाऱ्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे औरंगाबाद शहराच्या नामांतराची घोषणा करतील याला अनेक कारणं आहे. ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्य मैदानावर उद्धव यांची सभा होणार आहे, त्याच मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. तर 8 मे 1988 मध्ये याच मैदानावर बाळासाहेबांनी पहिल्यांदाच औरंगाबादच संभाजीनगर म्हणून उल्लेख केला होता. तेव्हापासून शिवसेनेचे सर्वच नेते संभाजीनगर असाच उल्लेख करतात. त्यामुळे बाळासाहेबांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादच्या सभेत 'संभाजीनगर'ची घोषणा करू शकतात.
पहिल्याच टिझरमध्ये संभाजीनगर..
उद्धव ठाकरेंच्या सभेचं शिवसेनेकडून टिझर पोस्ट करण्यात आला आहे. या टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा भाषण दाखवण्यात आला आहे. ज्यात औरंगाबाद नव्हे संभाजीनगर, आम्ही नाव दिलं आहे, असे बाळासाहेब म्हणतायत. सभेच्या पहिल्याच टिझरमध्ये संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आला असल्याने, उद्धव ठाकरे औरंगाबादच्या सभेत नामांतराची घोषणा करू शकतात असे बोलले जात आहे. त्यामुळे सर्वांनाच उद्धव ठाकरेंच्या भाषणाची आणि घोषणेची उत्सुकता लागली आहे.
निवडणूक आणि नामांतराचा मुद्दा...
निवडणुका आल्या की महाराष्ट्रात एक विषय हमखास चर्चिला जातो. आणि तो इतका हॉट आणि हिट होतो, की तिच्यावर सगळेच राजकीय नेते एकमेकांकडे बोट दाखवून बोलायला लागतात. तो विषय म्हणजे संभाजीनगर की औरंगाबाद. आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे औरंगाबादची निवडणूक नामांतराच्या मुद्याशिवाय होऊच शकत नाही. अनेक वर्षे या मुद्यावरून महापालिकेत शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भाषणात सुद्धा नामांतराच्या विषय आघाडीवर असण्याची शक्यता आहे.