Ashadhi Ekadashi : ....तर आषाढी एकादशी हंपीत साजरी झाली असती
तुंगभद्रा नदी काठी वसलेलं, चार ही बाजूला तटबंदी असलेलं आणि 56 स्तंभांवर उभारलेलं हे कर्नाटकच्या हंपीमधील विठुरायचं मंदिर आहे.
पंढरपूर : गेली तीन शतकं सुरू असलेला आषाढी वारीचा पायी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करतो, आषाढी एकादशी देखील पंढरपुरातच पार पडते. प्रत्येक वारकरी याच पंढरपूरच्या मंदिरातील विठुरायाच्या चरणी माथा टेकवतो अन साकडं घालतो. पण आख्यायिकेनुसार जर राजा कृष्णदेवराय यांनी विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरमध्ये स्थापित केली नसती तर आज आषाढी वारीचा पायी सोहळा हंपीच्या दिशेने प्रस्थान झाला असता, आषाढी एकादशी देखील हंपीत साजरी झाली असती अन वारकऱ्यांना देखील हंपीतील विठ्ठल मंदिरात दर्शनाला रांगा लावाव्या लागल्या असत्या.
तुंगभद्रा नदी काठी वसलेलं, चार ही बाजूला तटबंदी असलेलं आणि 56 स्तंभांवर उभारलेलं हे कर्नाटकच्या हंपीमधील विठुरायचं मंदिर आहे. विजयनगर साम्राज्य अर्थात राजा कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत हे भव्य-दिव्य मंदिर उभारलं गेलं. पंधराव्या शतकातील या मंदिरात राजा कृष्णदेवराय यांनी पंढरपूरमधील विठ्ठलाची मूर्ती स्थापित केली होती, असं इतिहासकार सांगतात. पंढरपूरच्या विठुरायावर राजा कृष्णदेवराय यांची निस्सिम भक्ती होती. हे मंदिर पहाताचक्षणी राजा कृष्णदेवराय यांची तीच भक्ती आपल्या नजरेसमोर अलगद उभी राहते. पिंपरी चिंचवडमधील ख्यातनाम फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर यांना त्यांच्या कॅमेऱ्यात ती भक्ती टिपण्याचं भाग्य लाभलं.
दगडी रथ द्रविडी स्थापत्यशैलीतील एक पीठ मानलं जातं. या रथ पीठावर आरूढ होऊन गरुड भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी जायचे, तसेच या रथामध्ये राजा कृष्णदेवराय यांनी विठुरायची मूर्ती विराजमान केली होती. अशी ही आख्यायिका सांगितली जाते. म्हणूनच हे रथ वारकरी, भाविक आणि पर्यटकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. मंदिराच्या मधोमध महामंडप आणि याच महामंडपाच्या गाभाऱ्यात विठुरायाची मूर्ती स्थापित होती. पण एके दिवशी राजा कृष्णदेवराय यांच्या स्वप्नात विठुराय स्वतः आले आणि त्यांनी मूर्ती पुन्हा एकदा पंढरपूरला स्थापन करायला सांगितली. तेच स्वप्न राजा कृष्णदेवराय यांनी पूर्ण केलं. म्हणून आज पंढरपूरच्या मंदिरात विठुरायचं आपण दर्शन घेतोय. पण यामुळं दुःखी झालेल्या राजा कृष्णदेवराय यांनी मात्र हंपीच्या मंदिरात पुन्हा मूर्ती स्थापितच केली नाही,असं काही इतिहासकार सांगतात. त्यामुळं आज वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा असणारं हे मंदिर मूर्तीविना उभं आहे.
राजा कृष्णदेवराय यांच्या काळात इथं मोठे सोहळे व्हायचे, त्या सोहळ्याला मोठी गर्दी ही व्हायची. त्यामुळं त्या आख्यायिकेनुसार जर राजा कृष्णदेवराय यांच्या स्वप्नात विठुराय आले नसते तर आज आषाढी एकादशी हंपीत साजरी झाली असती. अनेक संतांच्या पालखीचे हंपीकडे प्रस्थान झाले असते. वारकऱ्यांनी हंपीतील मंदिरात जाऊन विठुरायाच्या चरणी माथा टेकवत साकडं घातलं असतं. पण आज हे भाग्य मात्र महाराष्ट्राच्या मातीला लाभलं.
आषाढी वारी आणि एकादशीवेळी कर्नाटकातील भाविकांचं पांडुरंगावरील अस्सीम प्रेम आणि भक्ती दिसून येते. ते पांडुरंगाला "कानडाऊ विठ्ठलू... कर्नाटकू.... तेणे मज लावियाल वेडू" अशी आर्थ हाक देतात. त्यांच्या या आर्थ हाकेतील त्यांचं पांडुरंगांचं वेड कसं आहे. हे तुम्हाला पहायचं असेल तर हंपीत जा आणि या विठ्ठल मंदिराची अनोखी देणगी एकदा प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवा.