Ashadhi Wari 2024 : आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताईच्या पालखी ने 18 जून रोजी कोथळी, मुक्ताईनगरातून परंपरेनुसार जुन्या मंदिरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. हा पालखी सोहळा प्रस्थान करत करत मलकापूर -मोताळा या मार्गाने राजुर घाटामध्ये संत मुक्ताई ची पालखी पोहचली आहे. प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषाने अवघा राजुर घाट दुमदुमला होता.


आज पालखी  बुलढाण्यात (Buldhana) मुक्कामी असणार आहे. तर उद्या पुन्हा सकाळी पूजन झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखी परत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. दरवर्षी बुलढाण्याच्या प्रसिद्ध असलेल्या राजुर घाटामध्ये ही पालखी एक बैल जोडीच्या रथावर नेत होते, मात्र बैलांना राजूर घाट चढणे शक्य नसल्याने या वर्षी दोन बैल जोडीच्या साहाय्याने हा घाट पार करत आहे.


दोन बैल जोडीच्या साह्याने चढला प्रसिद्ध राजुर घाट


दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला दिला जातो, त्या संत मुक्ताईंच्या दिंडीला तीन शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. संत मुक्ताई संस्थानाच्यावतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते. दिंडीचे यावर्षीचे हे 315वे वर्ष आहे. आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांच्या दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला आहे.


पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान


संत मुक्ताईची दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत 28 दिवसांत तब्बल 600 किलोमीटरचे अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते. तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती तसेच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडविली जाते. यावेळी संत मुक्ताईला साडीचोळीचा आहेर भावांकडून भेट दिला जातो. पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो, अशी माहिती श्रीक्षेत्र मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर चे पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. रविंद्र महाराज हरणे यांनी दिली. 


सरकारचा मोठा निर्णय


यंदा शासनाने पालखी सोहळ्यातील दिंड्यांना 20 हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील वारकरी संप्रदायाला खुश करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत वारकरी संप्रदायाने केलं होतं. त्यानंतर आता दुसरा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  आता आषाढीच्या शासकीय महापूजेस 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना निमंत्रण दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यात्मिक आघाडी प्रमुख अक्षय महाराज भोसले यांनी यासाठी पाठपुरावा केल्याने पुन्हा एकदा महायुतीत शिंदे शिवसेनेला मोठा फायदा मिळणार आहे.


वारकरी सांप्रदाय खुश


आता विठ्ठलाचा गाभारा आणि सोळखांबी मध्ये ही वाढलेली मानकऱ्यांची संख्या कशी मावणार हा प्रश्न देखील पडणार आहे. दरम्यान, शासनाने आषाढी वारीसाठी सोहळ्यात चालणाऱ्या सुमारे 1500 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाचं राज्यातील दिंडी प्रमुखांनी स्वागत केलं.


इतर महत्वाच्या बातम्या