असदुद्दीन ओवेसी म्हणाले, आम्ही पंतप्रधानांच्या घरासमोर कुराण वाचलं तर...
एखाद्याच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणणे बरोबर नसल्याचे मत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi ) यांनी व्यक्त केले आहे.
Asaduddin Owaisi : एखाद्याच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणणे बरोबर नसल्याचे मत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे. "मी आणि इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जाऊन कुराणातील काही भाग वाचण्याची घोषणा केली तर, तुम्ही काय कराल? आमच्यावर गोळीबार करतील, त्यामुळे हे बरोबर नाही. राजद्रोहाचा गुन्हा लावणे यावर कोर्ट योग्य निर्णय घेत आहे. तुम्ही आंदोलन करा, तुम्हाला कोण थांबवत आहे? परंतु, कुणाच्या घरासमोर असं करणं योग्य नाही, असं मत असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे. नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत ओवेसी बोलत होते.
मशिदींवरील भोंगे काढले नाहित तर हनुमान चालिसाचे पठण केले जाईल या राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून ओवेसी यांनी आपले मत व्यक्त केले.
ते म्हणाले, भाजप आणि शिवसेना सत्तेत असताना मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना भोंग्याची आठवण आली नाही. मग आता अचानक या सर्व गोष्टी उचलल्या जात आहेत. जिथे-जिथे भाजपची सत्ता आहे तिथे कायदे नाहीत तर बुलडोझर कायदा पाहायला मिळत आहे. कारण तेथील भाजप सरकारला कोर्ट, पोलीस आणि संविधानावर विश्वास नाही. त्यामुळे आशा प्रकारे मुस्लिम समाजाला शिक्षा दिली जात आहे. संविधनासाठी हे बरं नाही, देशाच्या पंतप्रधानांनी आता तरी आपली चुप्पी सोडली पाहिजे."
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक झाल्याचे दिसत आहे. यावर बोलताना ओवेसी म्हणाले, हा दोन्ही भावांमधील वाद असून, मला त्यात काही घेणं देणं नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे की, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडायाला नको आणि याची जवाबदारी राज्य सरकारची आहे. कुणाला परवानगी देत असताना तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही, याची जवाबदारी सरकारची असून, ती सरकरकडून नीट पार पाडली जाईल अशी अपेक्षा आहे."
ओवेसी म्हणाले, "आम्ही माणूस असून भारताचे नागरिक आहोत. देशात जे काही राजकारण सुरू आहे त्यात सर्वात जास्त हिंदुत्ववादी कोण आहे याची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत काँग्रेस,भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी, आपसह सर्वच पक्ष आहेत."
दरम्यान, महाआघाडीमध्ये एमआयएमला सहभागी करून घेण्याच्या ओवेसी यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एमआयएमने आधी भाजपविरोधी असल्याचे सिद्ध करावे असे म्हटले होते. ओवेसी यांनी आज जयंत पाटील यांच्या या आवाहनालाही प्रत्यूत्तर दिले. "आता मी त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत आहे. त्यांनी सांगावे की भाजपमध्ये ते कधी जाणार आहेत. कारण मी येतोय म्हटल्यानंतर त्यांची झोप उडते, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
"भोंग्यांचा मुद्दा म्हणजे मुस्लिम विरोधात तयार केले जात असलेल्या वातावरणाचा एक भाग आहे. आम्ही कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या भूमिकेत आहोत. आम्ही निवडणूक लढवून शिवसेनेचा पराभव केला याचं दुःख संजय राऊत यांना आहे. त्यामुळे आम्हाला बी टीम म्हणून आमच्यावर राग काढत आहेत.
भाजपची सत्ता असलेल्या राज्यात दारू बंदी करावी
"दारूवर का बंधी येत नाही? भाजपची जिथे जिथे सत्ता आहे तिथे बंदी घाला. तेथे दारूवर बंदी का घातली जात नाही? कारण संध्याकाळ झाली का यांनाच लागते, अशी टिप्पणी ओवेसी यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या
Alwar Demolition: शिव मंदिर पाडल्याच्या मुद्यावरुन ओवेसी आक्रमक, म्हणाले भाजप RSS ने माफी मागावी