Kolhapur Rain Update : गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळी 11 वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 7 इंच होती. गेल्या 24 तासात पासून पंचगंगेची पातळी स्थिर आहे. जिल्ह्यातील 76 बंधारे पाण्याखाली आहेत.
शाहूवाडी तालुक्यामधे भूस्खलनाची घटना
दरम्यान, शाहूवाडी तालुक्यात भूस्खलन घडल्याची घटना घडली. त्यानंतर प्रशासनाकडून रस्त्यावर आलेला राडारोडा बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. यामुळे कोल्हापूर येथील शाहुवाडी तालुक्यातील करंजफेण परिसरात भुस्खलन झाले.
राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद
दरम्यान, आज सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी राधानगरी धरणाचा तीन नंबरचे स्वयंचलित दार बंद झालं आहे. धरणाचे एकूण 4 दरवाजे (4,5,6,7) उघडे आहेत. या चार दरवाज्यातून 5 हजार 712 क्युसेक विसर्ग सुरु आहे, तर पाॅवर हाऊसमधून 1600 क्युसेक विसर्ग होत आहे. धरणातून एकूण विसर्ग 7 हजार 312 क्युसेक्सने सुरू आहे.
तुळशी धरणातूनही पाण्याचा विसर्ग
आजपासून तुळशी धरण पूर्ण भरल्याने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग वाढवून 1700 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना तुळशी धरण प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
इचलकंजीमध्ये पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल
धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे नदीपात्रामध्ये संथ गतीने वाढ होत आहे. इचलकरंजीमध्ये पंचगंगा इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. पुराचे पाणी नदी काठावरील स्मशानभूमी, वरद विनायक मंदिर, तसेच रेणुका मंदिर परिसरात आल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
गडहिंग्लज चंदगड राज्यमार्ग बंद
भडगांव हिरणकेशी पुलावर दोन फुट पाणी आल्याने गडहिंग्लज चंदगड राज्य मार्ग बंद झाला आहे. कोल्हापूर गारगोटी गडहिंग्लज नागणवाडी राज्यमार्गावर हिरण्यकेशी नदीवरील भडगांव पूलावर १ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद करणेत आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या