Kolhapur News : पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफ जवानांच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून एनडीआरएफच्या या टीम कोल्हापूरमध्येल तळ ठोकून आहेत.


आज देशभरात बहिण भावाच्या नात्याचा आनंद द्विगुणित आणि वृद्धिंगत करणारा रक्षाबंधन सण साजरा केला जात आहे. या पवित्र सणाच्या दिवशी आपल्या रक्षणासाठी आलेल्या एनडीआरएफ जवानांना कोल्हापुरातील महिला भगिनींनी राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा पार पाडला.


एनडीआरएफचे जवान आपलं रक्षण करण्यासाठीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांना राखी बांधून या जवानांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील महिलांनी केला आहे. यामध्ये राजश्री गायकवाड, अर्चना कोरे, श्रेया मर्दाने वेदश्री गायकवाड आदी महिला भगिनींचा समावेश होता. एनडीआरएफच्या जवानांनी देखील या महिला भगिनींचे आभार मानून आमच्या सर्व जवानांना अशाच पद्धतीने प्रेम मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


पंचगंगेची पाणी पातळी 41 फुट 7 इंचांवर, पावसाचा जोर ओसरला, 73 बंधारे पाण्याखाली


दरम्यान, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने गेल्या 24 तासांपासून उसंत घेतली आहे. तथापि, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ अजूनही सुरुच आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 41 फुट 7 इंचावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील  73 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 7 राज्यमार्गांवर पाणी आले आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रमुख 24 मार्ग पाणी आल्याने बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 31 मार्गांवर थेट संपर्क तुटल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. 7 राज्यमार्गांवर 12 ठिकाणी पाण्याने वेढा दिला आहे. प्रमुख 24 मार्गावर 26 ठिकाणी पाण्याचा विळखा आहे. 


चिखली, आंबेवाडीमधील 500 कुटुंबांचे स्थलांतर 


पुराच्या पाण्याचा वेढा वाढत चालल्याने करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली व आंबेवाडी गावामध्ये दक्षतेचा उपाय म्हणून 500 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या दोन्ही गावात अजून पाणी आलेले नाही.


इचलकरंजीत पंचगंगेची पातळी 64 फुटांवर


 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने पंचगंगा नदीची पाणी वाढत चालली आहे. इचलकरंजीमध्ये पाणी पातळी  तब्बल 64 फुटांवर गेली आहे. जुन्या पुलावर पाणी आल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  


जिल्ह्यात एसटी बंद असलेले मार्ग



  • कोल्हापूर ते गगनबावडा

  • इचलकरंजी ते कुरुंदवाड 

  •  गडहिंग्लज ते ऐनापूर 

  • मलकापूर ते शित्तूर

  •  चंदगड ते दोडामार्ग

  • गगनबावडा ते करुळ घाट 

  • आजरा ते देव कांडगाव