मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधून चांगलाच विरोध होत असल्याचं दिसून येतंय. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी आता गाण्याच्या माध्यमातूनही होत आहे. असंच एक गाण, 'माफी मांगो राज ठाकरे... अगर अयोध्या आना है' हे गाणं चांगलंच व्हायरल होत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाच जून रोजी अयोध्याला जाणार आहे. मात्र याला भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी विरोध केला. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागावी, अथवा त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही अशी मागणी केली आहे. या बाबत आता रोज वातावरण तापत असताना या मुद्द्यावर चक्क एक गाणं तयार करण्यात आलं आहे. ते गाणं सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे.
'माफी मांगो राज ठाकरे' हे गाणे महेश निर्मोही नामक गायकाने ते गायले असून कवी योगेश दास शास्त्री यांचे बोल आहेत. या गाण्यात राज ठाकरे हे राजकारण म्हणून अयोध्येत येत असून ते उत्पात घडवणारे आहेत, सर्व उत्तर भारतीयांनी त्यांना विरोध करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर ब्रिजभूषण यांना या गाण्यात समर्थन देण्यात आले आहे. एका दिवसांपूर्वी हे गाणे यूट्युबवर अपलोड करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.
गाण्याचा आशय असा...
राज ठाकरेंना जर अयोध्याला यायचं असेल तर त्यांनी पहिला उत्तर भारतीयांची माफी मागितली पाहिजे. अन्यथा तुम्हाला अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही असं आमच्या नेत्याने ठरवलं आहे. श्रीरामांचे आम्ही वंशज आहोत, त्यामुळे रामाचाही तुम्ही अपमान केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये यायचं असेल तर माफी मागा. 5 जूनला आपलं कर्तव्य करण्यासाठी सर्वांनी अयोध्येला यायचं आहे. उत्तर भारतीयांना अपराधी म्हणणारे तुम्ही पण पापी आहात. तुम्ही आपल्या राजकारणाच्या फायद्यासाठी अयोध्याला येताय हे आम्हाला माहिती आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना अयोध्येत रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या या दौऱ्याला विरोध केला असून त्यांच्या विरोधात साधू-संत आणि नागरिकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मात्र विरोध असूनही राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येत जाण्याचं जाहीर केलंय. मनसेनं या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Raj Thackeray Ayodhya Visit : विरोधानंतरही राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर ठाम, मोठ्या प्रमाणात तयारी सुरू, 11 ट्रेन बुक करण्याची तयारी
- Brijbhushan Singh यांचा बोलविता धनी नेमका कोण? चावी पवारांनी फिरवली की ही भाजपच्या संतुलनाची खेळी?
- भाजप खासदारांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा विरोध करु नये : देवेंद्र फडणवीस