नवी दिल्ली : मराठीचा मुद्दा बाजूला ठेवत राज ठाकरेंनी हिंदुत्वाची कास धरली, अयोध्येचा दौरा जाहीर केला, योगींचं कौतुक केलं, राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. सगळं काही सुरळीत चाललंय असं वाटत असतानाच भाजपचेच खासदार बृजभूषण सिंह यांची या सीनमध्ये एन्ट्री झाली आणि सगळा नूर पालटला. उत्तर भारतीयांची माफी मागा नाहीतर अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशातल्या गावागावात रॅली सुरु केल्या आहेत.


महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या आणि भाजपच्या जवळीकीची चर्चा सुरु असताना आता भाजपचेच खासदार या मुद्द्यावर इतकं आक्रमक का बोलत असावेत हा कळीचा प्रश्न. त्यामुळे बृजभूषण सिंह यांच्यापाठीमागे नेमकं कोण आहे याची चर्चा होणं स्वाभाविक आहे. 


राज्यात आणि विशेषत: मुंबईत उत्तर भारतीय मतदार हा भाजपसाठी महत्त्वाचा. मनसे आणि भाजपची युती होणार का असा प्रश्न विचारल्यानंतर राज्यातले भाजप नेते कायम उत्तर देत आलेत की जोपर्यंत उत्तर भारतीयांबद्दल त्यांची भूमिका बदलत नाही तोपर्यंत त्यांना सोबत घेणं शक्य नाही. बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्याने उत्तर भारतीयांचा अहंकार गोंजारला जात असेल तर भाजपलाही ते हवंच आहे. त्याचमुळे त्यांच्या या वक्तव्याला थेट खोडून काढणारं वक्तव्य अद्याप भाजपच्या कुठल्या ज्येष्ठ नेत्याने केलेलं नाही. 


उत्तर भारतात दबंग नेत्यांची जी एक परंपरा आहे, त्याच परंपरेतले बृजभूषण सिंह हे सहाव्यांदा खासदार आहेत. स्थानिक पातळीवरची त्यांची ताकद, बाबरी विद्ध्वंस प्रकरणातले एक आरोपी म्हणून त्यांचा इतिहास हे सगळं भाजपला तिथल्या राजकारणासाठी पूरकच ठरत आलेलं आहे. 


बृजभूषण यांचा बोलविता धनी कोण?
- बृजभूषण यांच्या निमित्तानं उत्तर भारतीयांच्या बाबतीत एक संतुलनाचं राजकारण भाजप खेळतेय का ही पहिली शंका
- राज ठाकरेंच्या मनसेशी जवळीक करतानाच भाजप उत्तर भारतीयांच्याही पाठीशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न 
- बृजभूषण कुठल्याही पक्षात असले तरी आपगल्या स्वतंत्र वाणीनं कायम वादातही राहिले आहेत. 
- बाबरी विद्ध्वंस प्रकरणातले आरोपी, मुंबईतल्या जेजे हॉस्पिटल शूट आऊटमध्ये दाऊदच्या हस्तकांना मदत केल्याचा आरोप ते स्थानिक लेवलला 55 इंटर कॉलेजच्या संस्थांचं जाळं, सहा वेळा खासदार, मुलगा आमदार ही सगळी ताकद कुठल्या पक्षाला नकोय. त्यामुळे त्या बदल्यात थोडसं वाणीचं स्वातंत्र्य त्यांना मिळत आलंय
- भारतीय कुस्ती महासंघाचे ते अध्यक्ष आहेत. त्यामुळे कुस्तीच्या राजकारणातून त्यांची पवारांशीही जवळीक आहे. 
- बृजभूषण हे राज ठाकरेंवर तुटून पडतात, पण मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंचा विषय आला की मवाळ होतात. उद्धव ठाकरेंवर आपण काही बोलणार नाही असं म्हणतात. हाही फरक लक्षात घेण्याजोगा. 


बृजभूषण सिंह हे राज ठाकरेंना इशारा देऊन थांबले नाहीत तर त्यांनी यूपीतल्या गावागावात सभा सुरु केल्या आहेत. दर ठिकाणी त्यांच्या सभांना 15 ते 20 हजार लोकं असतात. एक सिंगल इंजिन हेलिकॉप्टरही त्यांनी त्यासाठी बुक केलं आहे आणि यूपीसह, बिहार, झारखंडच्या अस्मितेचाही मुद्दा ते उपस्थित करत आहेत. 


सुरुवात भाजपमधून नंतर सपात आणि 2014 च्या आधी पुन्हा भाजपमध्ये असा बृजभूषण यांचा राजकीय प्रवास आहे. राम मंदिर आंदोलनाच्या निमित्ताने त्यांचे अयोध्येतल्या संताशींही संबंध आले आहेत. एकीकडे राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा आवाज प्रखर होत असतानाच त्यांच्या वाटेत बृजभूषण सिंह हे प्यादं नेमकं कुणी आणून ठेवलं याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. हा एपिसोड आता राज ठाकरेंच्या माफीने संपतो की बृजभूषण यांच्या माघारीने हे लवकरच कळेल.