MIM VS MNS: राज्यात आता मनसे विरुद्ध एमआयएम असा वाद पेटताना दिसत आहे. औरंगाबादेत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सभा घेत मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिल होत. आता यावरूनच एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की, ज्याला घरातून बाहेर काढलं, त्याला काय उत्तर द्यायचं, असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली आहे. 


औरंगाबादेत झालेल्या सभेत अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले की, ''मी येथे कोणाला उत्तर द्यायला आलो नाही. मी कोणाला वाईट बोलायला आलो नाही. तस करण्याची मला गरज ही नाही आहे. आमचा तर एक खासदार आहे, तुम्ही तर बेघर आहे, तुम्हाला काय उत्तर देणार. ज्याला घरातून बाहेर काढलं आहे, त्याला काय उत्तर द्यायचं.'' ते म्हणाले, ''देशात आज द्वेषपूर्ण भाषेचा वापर केला जात आहे, मात्र अकबरुद्दीन ओवेसी द्वेषाचं उत्तर द्वेषाने नाही तर प्रेमाने देईल. भावनिक होण्याची गरज नाही. कायदा आपल्या हातात घेण्याचीही आवश्यकता नाही. निश्चित राहा. द्वेष पसरवणाऱ्यांनी 40 टक्के मते मिळवली, मात्र आजही 60 टक्के लोक यांच्यासोबत नाही.'' 


अकबरुद्दीन ओवेसी पुढे म्हणाले की, जीही कुत्री जशीही भुंकत आहे, त्यांना भुंकू द्या. कुत्र्यांचं काम भुंकणे आहे, वाघाचं काम शांत चालत जाणं आहे. ते तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तुम्ही फसू नका. ते जे बोलत आहेत, त्यांना बोलू द्या, तुम्ही फक्त हसा आणि पुढे व्हा, असं ते म्हणाले आहेत. 


अकबरुद्दीन ओवेसी यांना आवरा, नाही तर; मनसेचा राज्य सरकारला इशारा 


अकबरुद्दीन ओवेसी यांच्या या भाषणावर मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, आम्ही भोंग्यांसारख्या सामाजिक विषयावर बोललो तरी महाराष्ट्र सरकार आमच्यावर कारवाई करते. आता अकबरुद्दीन ओवेसी यांनी भडकाऊ भाषण केलं आहे, त्यांच्यावर राज्य सरकार कारवाई करणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले आहेत की, जे औरंगजेबाच्या कबरीला भेट देतात, जिथे मुस्लीम समाजही जात नाही, त्यांना नेमकं महाराष्ट्रात काय घडवायचं आहे. ओवेसी यांच्या मागे महाराष्ट्र सरकारचा हात आहे का? आमच्यासाठी इतक्या अटी शर्ती, यांना मात्र असेच मोकळे सोडले आहे. सरकारने यांना वेळेस आवरावे, नाही मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असं ते म्हणाले आहेत.