Raj Thackeray Ayodhya Visit : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे. "आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावं", असं भाजप खासदार म्हणतात. तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी हे देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध करत आहेत.
मनसेकडून अयोध्या दौऱ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी
सर्व विरोधानंतरही राज ठाकरे अयोध्येला जाण्यावर ठाम आहेत. मनसेच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांतून मनसे कार्यकर्ते अयोध्येला पाठवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी 11 गाड्यांचे बुकिंग करण्यात येत आहे. राज ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते तेथे पोहोचणार आहेत. यासोबतच सर्व कार्यकर्ते आपापल्या परीने लखनौ आणि अयोध्येला येणार आहेत. उत्तर प्रदेश दौऱ्याच्या माध्यमातून राज ठाकरे महाराष्ट्रातील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक जोर देण्याचा प्रयत्न करतील.
प्रथमच मुख्यमंत्री योगी यांची घेणार भेट
5 जून रोजी राज ठाकरेंचा पहिला कार्यक्रम यूपीची राजधानी लखनऊमध्ये होणार आहे. राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान, लाऊडस्पीकर आणि रस्त्यावरील धार्मिक मेळाव्यावर बंदी आणल्याबद्दल ते त्यांचे औपचारिक अभिनंदन करतील. येथून पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक थेट अयोध्येला पोहोचतील. तर अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासोबतच मनसे प्रमुखांचा हनुमानगढीमध्ये बजरंगबलीची पूजा आणि हनुमान चालिसाचे पठण करण्याचाही कार्यक्रम आहे. मात्र, त्यांच्या या दौऱ्याला केसरगंजमधील भाजप खासदारांकडून विरोध केला जात आहे. तर अयोध्येतील भाजप खासदार लल्लू सिंह राज ठाकरेंच्या दौऱ्याचे समर्थन करत आहेत.
राज ठाकरेंना बृजभूषण सिंह यांचं चॅलेंज!
अयोध्येत राज ठाकरे यांना रोखण्याची तयारी सुरु झालीय. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी आज त्यासाठी बैठक बोलावली. नंदिनीनगर इथे साधुसंत आणि नागरिकांसोबत त्यांनी बैठक घेतली. राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येत जाण्याचं जाहीर केलंय. मनसेनं या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु केलीय. तर उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतलीय. त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.