Mumbai News : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर असोसिएशनने (Tanker Association) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरण (CGWA) ने मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठादारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. केंद्राच्या या नवीन धोरणांविरोधात मुंबईतील 1500 टॅंकर संपावर गेले आहेत. 


नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शहरातील पाणी उपशासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आवश्यक असेल. मात्र , ना-हरकत प्रमाणपत्रे घेणे व्यवहार्य नसल्याचे सांगत मुंबईतील सर्व म्हणजे 1500 पाण्याचे टँकर संपावर आहेत. सध्या एका विहिरीतून फक्त 15 टँकर पाणी काढता येते आणि त्यासाटी प्रति टँकर 100 रुपये एवढी रक्कम भूजल प्राधिकरणाकडे वर्षभरासाठी आगाऊ भरावी लागते. 


टॅंकर असोसिएशनचे सरचिटणीस राजेश ठाकूर यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना  सांगितले की, "एका विहिरीतून फक्त 15 टँकर पाणी काढण्यासाठी प्रति टॅंकर 100 रूपये म्हणजे वर्षभरासाठी 547, 500 एवढी रक्कम आगाऊ भरावी लागणार आहे. त्याशिवाय फूटपाथ किंवा रस्त्यावर पाणी भरता येणार नाही. विहिरीभोवती 200 चौरस मीटर जागा असावी लागते. जागेअभावी मुंबईतील कोणताही पुरवठादार ही अट पूर्ण करू शकत नाही. 


"आम्ही फक्त पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याचा पुरवठा करतो. हे आमच्या एजन्सींना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी आम्हाला आरओ प्लांटची आवश्यकता आहे. आमचा पुरवठा बांधकाम साइट्स, हॉटेल्स आणि इतर कारणांसाठी आहे" असेही राजेश ठाकूर यांनी सांगितले. 


भूजल प्राधिकरणाच्या एस. डी. वाघमारे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले. "7 मार्च रोजी बीएमसी आणि इतर एजन्सींना पत्र लिहिले आणि सांगितले की, नवीन मार्गदर्शक तत्त्वे मुंबईत लागू करण्यात आली आहेत. पुरवठादारांना पाणी उपशासाठी एनओसीची आवश्यकता असेल.  


भूजल प्राधिकरणाने जाही केलेल्या या अटींची पूर्तता करता येणार नाही, असे वॉटर टँकर असोसिएशनचे मत आहे. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघेपर्यंत आसोसिएशन याविरोधात आंदोलन करणार आहेत. परंतु, असोसिएशनच्या या संपामुळे शहरातील पायाभूत सुविधा प्रकल्प आणि निवासी सोसायट्यांना अडचणी येऊ शकतात.