(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Arnab Goswami LIVE UPDATES | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1.30 वाजता संवाद साधणार
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री अलिबाग कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आली आहे.
LIVE
Background
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अर्णब यांना आता 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. पोलिसांनी मागितलेली कस्टडी नाकारल्याने अर्णब यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात आज अर्णब गोस्वामी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत. पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णब गोस्वामी यांचा आरोपही कोर्टाने फेटाळला आहे.
काय आहे प्रकरण?
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
बुधवारी सकाळी काय घडलं?
बुधवारी पहाटे पाच वाजता रायगड पोलीस मुंबई पोलिसांच्या टीमसह अर्णब गोस्वामी यांच्या वरळीतील घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना घरातच घुसू दिलं नाही. त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी दीड तास पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यांच्या पत्नीने हे सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं आणि संपूर्ण व्हिडीओ चॅनलवर दाखवला. अटक वॉरंटनुसारच पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली. सात-साडेसातच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आलं. एखाद्याला अटक केल्यानंतर दुसऱ्या हद्दीत नेण्यापूर्वी डायरी करावी लागते. त्यानुसार ना म जोशी पोलीस स्टेशनमध्ये डायरी केल्यानंतर पोलीस त्यांना अलिबागला घेऊन गेले.