Devendra Fadnavis : सिलिंडरच्या किंमती वाढल्या हा आणखी एक खोटा नरेटिव्ह, आपल्या योजना लोकांना सांगा : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : विरोधकांकडून सातत्याने खोटा नरेटीव्ह पसरवून सरकारवर आरोप केले जात आहेत. मात्र, आपल्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई : भाजपच्या प्रदेश अधिवेशनामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचा सल्ला दिला. तसेच विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला बळी न पडता त्यांना थेट उत्तर देण्याचा सुद्धा आवाहन केलं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून खोटं नरेटिव्ह पसरवण्यात येत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांसह नेत्यांना सुद्धा सोशल मीडियातून सक्रिय होण्याचे आवाहन केले. फडणवीस म्हणाले की विरोधकांकडून सातत्याने खोटा नरेटीव्ह पसरवून सरकारवर आरोप केले जात आहेत. मात्र, आपल्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.
विरोधक म्हणतात सिलिंडरच्या किमती वाढल्या
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवतात. विरोधक म्हणतात सिलिंडरच्या किमती वाढल्या. आम्ही 2013 सालच्या सिलिंडरच्या किमती दाखवल्या. त्या सध्याच्या किमतीपेक्षा अधिक होत्या. या किमती दाखवल्यानंतर ते गप्प बसतात. मी आत्मचिंतन करत आहे. आपली एक अडचण आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं. पण प्रत्येकजण आदेशाची वाट पाहतो. आदेश आला तर मी उत्तर देईन. नाहीतर देणार नाही, असे प्रत्येकजण म्हणतो, असे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या 90 टक्के कार्यकर्त्यांना माहिती आपल्याला काही मिळणार नाही, पण ते विचारासाठी काम करतात. अजित पवारांच्या महायुतीमधील प्रवेशावर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले की नवीन मित्र आल्याने काहींना आवडलं, काहींना आवडलेलं नाही. आपण खुर्चीसाठी काही केलं नाही. काहीवेळा ध्येय सादर करण्यासाठी दोन पाऊल मागे याव लागतं, तर काहीवेळा दोन पावले पुढे जावं लागलं जावं लागतं. आगामी विधानसभेत अडीच कोटी मते घेणार आहोत. मुख्यमंत्री कोण होणार आज विचारू नका. मुख्यमंत्री महायुतीचा होणार असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यावेळी भाजप सर्व राज्यातील सर्वांत मोठा पक्ष असेल आणि राज्यात महायुती सरकार येणार, असेही फडणवीस म्हणाले.
फडणवीसांनी 20 दिवस जागून मराठा आरक्षण कायद्याचा मसुदा तयार केला
दरम्यान, अधिवेशनात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आज महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे या राजकारणाला आपण सर्वांनी जशास तसे उत्तर दिले पाहिजे. सर्वांनी या विषयावर बोललं पाहिजे. सर्वांनी या विषयावर बुथपर्यंत आपल्या भागात जाऊन बोललं पाहिजे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा आणि संपूर्ण टीमने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम झाले. त्यावेळी जे काम झाले, मला आठवते, मी मंत्री होतो. त्या काळात देवेंद्रजींनी 20 रात्री जागून टिकणाऱ्या मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केला. ते पहाटे चार वाजेपर्यंत जागायचे. आम्ही त्यांना म्हणायचो, तब्येतीची काळजी घ्या, असे बावनकुळे यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या