Anil Deshmukh Case : अनिल देशमुख आहेत कुठे? शोधण्यासाठी ईडीनं मागितली सीबीआयकडे मदत
Anil Deshmukh Case : वारंवार समन्स बजावल्यानंतरही चौकशीसाठी गैरहजर राहिल्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ईडीनं शोध सुरु केलाय. अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली आहे.
![Anil Deshmukh Case : अनिल देशमुख आहेत कुठे? शोधण्यासाठी ईडीनं मागितली सीबीआयकडे मदत Anil Deshmukh Case ed ask help cbi find ncp leader anil deshmukh money laundering case Anil Deshmukh Case : अनिल देशमुख आहेत कुठे? शोधण्यासाठी ईडीनं मागितली सीबीआयकडे मदत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/26/5607f066a7978b7f0b46d590bbb7e192_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Anil Deshmukh Case : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नाहीत. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. अशातच आता अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. सीबीआयने 20 मिनिटं त्यांची चौकशी केली आणि त्यांची सुटका केली. मात्र त्यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली होती. सीबीआयचा प्राथमिक चौकशी अहवाल देशमुख यांनीच लीक केल्याचा सीबीआयला संशय आहे. या प्रकरणात गौरव चतुर्वेदी आणि आनंद डागा यांचं नाव समोर आल्याचं बोललं जात होतं. म्हणूनच याप्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. तसेच राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांची नावंही समोर आली होती.
अनिल देशमुख प्रकरणाचा सीबीआयचा प्राथमिक चौकशी अहवाल लीक केल्या प्रकरणी त्यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे निरीक्षक अभिषेक तिवारी यांना दिल्ली न्यायालयानं दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. सीबीआयनं या दोघांना गेल्या आठवड्यात अटक केली होती. तिवारी हे वकील डागा यांच्या संपर्कात होते. त्यांच्यातील संभाषण हाती लागल्यानं आणि पुरावे मिळाल्यावर या दोघांनाही अटक केल्याचं सीबीआयनं न्यायालयात सांगितले होतं.
वारंवार समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख गैरहजर
अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना दोन वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आले. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.
पाचही वेळा अनिल देशमुख यांनी आपल्या वकिलांमार्फत ईडीला पत्र पाठवून हजर होण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र अनिल देशमुख कधीच ईडीपुढे चौकशीला हजर झाले नाही. त्यातच ईडीनं त्यांच्यावरील कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले, तर अनिल देशमुख यांची साडेचार कोटींची संपत्ती जप्त केली. अनिल देशमुख असं म्हणाले होते की, कोर्टाचा निकाल आल्यानंतर ते ईडीसमोर हजर होतील. मात्र कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली, पण त्यांनतरही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)