अनिल - टिना अंबानी महाबळेश्वरमध्ये; लॉकडाऊन काळात मैदानात चालण्यासाठी आले अन्...
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रशासनानं लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला
महाबळेश्वर : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रशासनानं लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या या निर्णयापूर्वीच अनेक भागांमध्ये अंशिक निर्बंध लागू करण्यात आले होते. लॉकडाऊन कोरोनाचं संकट पाहता अनेकांनीच ग्रामीण भागाची वाट धरल्याचंही पाहायला मिळालं. उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टिना अंबानी हेसुद्धा त्यापैकीच एक.
सध्या अनिल आणि टिना अंबानी हे महाबळेश्वरमध्ये आहेत. लॉकडाऊन अधिक कठोर करण्यात आल्यापासूनच ते महाबळेश्वरातील त्यांच्या लाल बंगल्यावर वास्तव्यास आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरीही अंबानी कुटुंब इव्हिनिंग वॉक आणि मॉर्निंग वॉकसाठी कायमच महाबळेश्वरातील रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. अनेक गावकऱ्यांनी आतापर्यंत त्यांना पाहिलं आहे.
आतातर महाबळेश्वर येथील गोल्फ मैदानावर वॉक करतानाचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यासंदर्भातील माहिती मिळताच स्थानिक नगरपालिकेने द क्लबला नोटीस देत या मैदानालाच टाळ लावलं आहे.
अनिल अंबानी आणि टिना अंबानी या मैदानावर इव्हिनिंग वॉकसाठी आल्याचे एक व्हिडिओतून समोर येताच महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी गोल्फ मैदानाची मालकी असलेल्या द क्लब या संस्थेच्या सचिवांना नोटीस बजावली. नोटीस मिळताच या गोल्फ मैदानाला टाळे ठोकण्यात आले. तसंच या ठिकाणी येण्यास आता सर्वांना मज्जाव करण्यात आलेला आहे.