सिंधुदुर्ग : कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली आहे. आंगणेवाडीच्या (Anganewadi) श्री देवी भराडी देवीचा यात्रोत्सव 24 फेब्रुवारीला संपन्न होणार आहे. देश विदेशातील भाविक आंगणेवाडी यात्रेला उपस्थिती लावतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हा उत्सव कोरोनाच्या सावटाखाली पार पडत आहे. भराडी देवी जत्रोत्सवाच्या तारीख निश्चितीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं लक्ष लागलेलं असतं. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या रेल्वे, बसचं तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावाच्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी मातेचा 'यात्रोत्सव आंगणेवाडी'ची यात्रा नावाने प्रसिद्ध आहे.


कोकणात जत्रा म्हटलं की उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. कोकणातील गावागावात वर्षाच्या ठराविक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र भराडी देवीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही, कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख ठरवण्याची प्रथाही उत्सुकतेची आहे. दिवाळीत शेतीची कामं झाली की आंगणेवाडीतील देवीचे मानकरी एका डाळीवर बसतात. यालाच डाळप स्वारी म्हणतात. देवीला कौल लावला जातो. कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित केला जातो. एकदा निश्चित झालेली तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही हे सुद्धा आंगणेवाडी यात्रेचे वैशिष्ट्य आहे.


गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला यात्रोत्सव केवळ आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. देश विदेशात असलेले लाखो भक्त या एका दिवसासाठी आंगणेवाडीत येऊन देवीचे दर्शन घेतात. परंतु कोरोना महामारीमुळे या सर्व भक्तांना श्री भराडी मातेचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र यावर्षी सर्व भाविकांना आंगणेवाडीत उपस्थित राहून श्री भराडी देवीचे दर्शन घेता येणार असल्याची माहिती आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी दिली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha