MHADA Exam Latest Update : जे विद्यार्थी म्हाडाच्या विविध पदांच्या परीक्षेसाठी निघाले असतील किंवा निघणार असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांची मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 



  

मंत्री जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलंय

'सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो'






आव्हाड यांच्या या ट्विटनंतर त्यावर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. बंद असताना विद्यार्थी आधीच शेकडो रुपये खर्चून नियोजन करून बसले होते. सरकारने प्रत्येक परीक्षार्थीच्या खात्यात नुकसानभरपाई म्हणून 2000 रु. जमा करावेत, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे. आरोग्य विभागमध्ये पण तेच म्हाडामध्ये पण तेच. सरकारचा नियोजन शून्य कारभार आहे, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे. 


आज म्हाडा साठी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी मध्यरात्री ट्विट करून दिली आहे. ही परीक्षा जानेवारी महिन्यात होईल असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. या परीक्षेसाठी आज सकाळच्या सत्रात 50 हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते.


काही दिवसांपूर्वी या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांकडून पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी ही दलाली पद्धत मोडीत काढण्यासाठी जी पदं भरायची आहेत. त्या परीक्षेची प्राथमिक परीक्षा आणि त्यातून गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांची मुख्य परीक्षा होईल असं जाहीर केलं होतं. यासोबतच त्या दलालांना उमेदवारांचे पैसे परत करा असा इशारा देखील दिला होता. आज ही परीक्षा होणं अपेक्षित होतं परंतु मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांनी काही तांत्रिक कारणास्तव आपण ही परीक्षा पुढे ढकलत असल्याचं म्हटलं आहे.