Padma Awards 2020: आनंद महिंद्रा यांच्यासह महाराष्ट्रातील मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव
Padma Awards 2020: पद्म पुरस्कार वितरण सोहळयास उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
Padma Awards 2020: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती भवन येथे सोमवारी सायंकाळी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरण सोहळयास उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
प्रजासत्त्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये सोमवारी सकाळी वर्ष 2020 च्या काही पद्म पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. सकाळी पार पडलेल्या समारोहात 4 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. वर्ष 2020 च्या उर्वरित पद्म पुरस्काराचे वितरण सोमवारी सायंकाळी करण्यात आले. यामध्ये एकूण सहा मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्म भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. आनंद महिंद्रा हे महिंद्रा समुहाचे चेयरमन आहेत. जगभरातील 100 देशांमध्ये त्यांचे उद्योगसमूह आहेत. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-यांना अन्य पाच मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये कला क्षेत्रातील योगदानासाठी 3 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सुरेश वाडकर यांना त्यांच्या अविट आवाजाने मराठी, हिंदीसह अन्य भाषेतील गायनासाठी सन्मानित करण्यात आले.
कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदासाठी एकता कपूर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दूरचित्रवाणी तसेच चित्रपट सृष्टीतील वैविध्यपूर्ण मालिका तसेच चित्रपट निर्माता म्हणून एकता कपूर यांची स्वतंत्र ओळख आहे. याशिवाय करण जोहर यांनाही कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पोपटराव पवार यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी पद्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बीजमाता म्हणून ओळखल्या जाणा-या अहमदनगर जिल्ह्याच्या राहीबाई पोपेरे यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी गौरिवण्यात आले. वर्ष 2020 मध्ये विविध क्षेत्रातील 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 16 मान्यवरांना पद्म भूषण आणि 118 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील 13 मान्यवरांचा समावेश आहे. सोमवारी झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये महाराष्ट्रातील एकूण 10 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.