Amruta Fadnavis, Priyanka Chaturvedi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या डिझायनर अनिक्षाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एक ट्वीट शेअर केले. प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी ट्वीट शेअर केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी देखील एक ट्वीट शेअर केलं. त्यानंतर प्रियांका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरु झाला. दोघींच्या ट्वीटनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.
प्रियंका चतुर्वेदी यांचे ट्वीट
एका न्यूज आर्टिकलचा फोटो शेअर करुन प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'गुन्हेगाराच्या मुलीला उपमुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश मिळतो आणि ती त्यांच्या पत्नीशी 5 वर्षांहून अधिक काळ मैत्री करते (विधानसभेतील DCM विधानानुसार). ती उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नींना दागिने, घालायला कपडे (प्रमोशनसाठी) देते. तसेच ती त्यांच्यासोबत गाडीमध्ये देखील फिरते.' आणखी एका ट्वीटमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी लिहिलं की, 'महाराष्ट्रात काय चालले आहे श्री नरेंद्र मोदी जी?' प्रियंका चतुर्वेदी यांच्या या ट्वीटला अमृता फडणवीस यांनी रिप्लाय दिला आहे.
अमृता फडणवीस यांचा रिप्लाय
प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्वीटला अमृता फडणवीस यांनी रिप्लाय दिला, 'मॅडम चतुर-आधी तुम्ही खोटा दावा केला होता की, मी AxisBank ला फायदा मिळवून दिला आणि आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात? निश्चितच, तुमचा विश्वास जिंकून, जर कोणी तुमच्याशी संपर्क साधला असता आणि केस बंद करण्यासाठी पैसे दिले असते, तर तुम्ही तुमच्या बॉसद्वारे त्याला मदत केली असती. तीच तुमची औकात आहे.'
प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटला रिप्लाय दिला, "नशीब, प्रमोशनसाठी डिझायनर कपडे विकत घेण्याची माझी औकात नाहीये. ज्यामुळे नंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. मिस फॅड-नॉइज. मला कळत नाही की स्वतंत्र तपासाच्या मागणीने तुमचा इतका गोंधळ का झाला? प्रामाणिकपणे ज्या दिवशी तिने तुम्हाला पैसे कमावण्याच्या टिप्स दिल्या त्याच दिवशी तुम्ही तिच्या विरोधात तक्रार करायला हवी होती," असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: