Nashik News : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. शेणखत खाली करत असताना अचानक उभ्या ट्रकमध्ये विद्युत प्रवाह उतरला अन् गाडीत असलेल्या चालकासह हमालाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निफाड (Niphad) तालुक्यातील दावचवाडी परिसरात ही घटना घडली आहे. 


दोनच दिवसांपूर्वी नाशिकच्या (Nashik)  मालेगाव तालुक्यात (Malegaon) दोन बापलेकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशातच काल (16 मार्च) पुन्हा निफाड तालुक्यातील दावचवाडी येथे शेतात शेणखत खाली करण्यासाठी गेलेल्या मालट्रकमध्ये विद्युत तारांचा स्पर्श होऊन प्रवाह (Electric Shock) उतरल्याने चालकासह हमालाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात (Pimplagaon Police) गुन्हा दाखल करण्यात आला. शेतात शेणखत खाली करत असताना ट्रकच्या समांतर विद्युत तारा लक्षात न आल्याने ट्रकमध्ये थेट करंट उतरला आणि होत्याच नव्हतं झालं. यात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 


नेमकं काय घडलं?


निफाड तालुक्यातील दावचवाडी गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुंबई येथील पारसनाथ गणपत पाल हे त्यांच्याकडील मालट्रकमध्ये शेणखत घेऊन पिंपळगाव बसवंत मार्गे दावचवाडी गावात आले. तिथून शेणखत खाली करणारे हमाल पप्पू सोमनाथ यादव आणि विजय प्रल्हाद शिंदे यांना या गाडीमध्ये बसवून पालखेड शिवारातील शेतकरी बाळासाहेब नाना आहेर यांच्या शेतात गाडीतील शेणखत खाली करण्यासाठी दावचवाडी ते पालखेड शिव रस्त्यावर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नेले. त्या ठिकाणी वीजतारा लोंबकळलेल्या होत्या. यावेळी हमाल आणि ड्रायव्हर या दोघांना विजेचा धक्का लागल्याने ते मालट्रकमधून बाहेर फेकले गेले आणि जमिनीवर खाली पडले. 


यावेळी गाडीमध्ये बसलेला हमाल पप्पू सोमनाथ यादव याने देखील गाडीतून खाली उडी मारली. मात्र तोपर्यंत विद्युत प्रवाह बंद झाल्याने त्यास विजेचा धक्का लागला नाही. मात्र मालट्रक मालक ड्रायव्हर पारसनाथ गणपत पाल आणि हमाल विजय प्रल्हाद शिंदे दावचवाडी या दोघांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत चालकावर गुन्हा दाखल करताच नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त करत नातेवाईकांनी पोलिसांना घेराव घातला. नंतर तपासाच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे तपास करत आहे. 


वीजतारांनी केला घात


दरम्यान पिंपळगाव बसवंत जवळील दावचवाडी ते पालखेड शिव रस्त्यावर वीजतारा लोंबकळलेल्या होत्या. तेव्हा विजय शिंदे हा मालट्रकचा क्लिनर बाजूने दरवाजात उभा राहून पाहत असताना चालकाने मालट्रक पुढे नेला आणि वरील जिवंत वीज तारेला मालट्रकचा पाठीमागून स्पर्श झाला. त्यावेळी मोठा आवाज होऊन मालट्रकमध्ये वीज प्रवाह उतरल्याने ट्रकच्या मागील क्लिनर साईटचे टायर फुटले आणि दोघांना विजेचा धक्का बसला. यात दोघांचाही मृत्यू झाला आहे.