ED Raid In Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरातून (Chhatrapati Sambhaji Nagar City) मोठी बातमी समोर येत असून, ईडीने (ED) नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली असल्याचे समोर आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. तर आज सकाळीच ईडीने शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी यापूर्वीच शहरातील सिटी चौक पोलिसात 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर ई निविदा प्रकरणात अटींचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तसेच महानगरपालिकेची फसवणूक केल्याचा या सर्वांवर आरोप आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणात आता 'ईडी'कडून छापेमारी करण्यात येत आहे.


काय आहे प्रकरण! 


छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरे बांधण्याच्या चार हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान यातील काही कंपन्यांनी अटींचे पालन न करता फसवणूक करण्याच्या प्रयत्न केल्याचे समोर आले होते. त्यामुळे अधिक चौकशी केल्यावर यातील समरथ कन्स्ट्रक्शन, इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सव्‍‌र्हिसेस व जगवार ग्लोबल सव्‍‌र्हिसेस या तीन कंपन्यांनी एकाच लॅपटॉपवरुन म्हणजे एकाच ‘आयपी’ अ‍ॅड्रेसवरुन भरल्याचे महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांच्या लक्षात आले. त्यामुळे महापालिकेच्या घरकुल बांधणीसाठी निविदा भरताना ‘रिंग’ केल्याचा ठपका ठेवत या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात 19 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तर याच प्रकरणात संबंधित कागदपत्र दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली होती. त्यानंतर आता ही छापेमारी करण्यात येत आहे. 


यांच्यावर करण्यात आला होता गुन्हा दाखल... 


अमर अशोक बाफना, पूजा अमर बाफना, निलेश वसंत शेंडे, अभिजीत वसंत शेंडे, योगेश रमेश शेंडे, स्वप्निल शशिकांत शेंडे, हरीश मोहनलाल माहेश्वरी, सतीश भागचंद रुणवाल (सर्वजण समरथ कन्स्ट्रक्शन अँड जेव्ही), रितेश राजेंद्र कांकरिया, हितेश मंसुख करणावत, शामकांत जे वाणी, सुनील पी नहार, प्रवीण भट्टड (सर्वजण इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस), सुनील नहार, नितीन द्वारकादास न्याती, पियुष नितीन न्याती, प्रवीण नितीन न्याती, मनोज अर्जुन गुंजल, आनंद फुलचंद नहार (सर्वजण जगवार ग्लोबल सर्विसेस कंपनी) अशी गुन्हा दाखल झालेल्या 19 जाणांची नावे आहेत. या सर्वांवर शहरातील  सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  


नऊ ठिकाणी छापेमारी...


दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर शहरातील एकूण 9 ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ज्यात शहरातील नारळीबाग परिसरात राहणाऱ्या एका कंत्राटदाराच्या घरावर ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी एकूण सहा अधिकारी कारवाई करत असल्याची माहिती मिळत आहे. तर वेगवेगळ्या 9 ठिकाणी अशीच कारवाई होत असल्याचे कळत आहे. सोबतच एका रुग्णालयात देखील याबाबत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शहरात या ईडीच्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. 


संबंधित बातमी : 


Pradhan Mantri Awas Yojana : औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत टेंडर घोटाळा, तब्बल 19 जाणांवर गुन्हा दाखल