National Anthem Maharashtra Live Updates : राज्याच्या विविध भागात 'सामूहिक राष्ट्रगीत गायन', नागरिकांचा चांगला प्रतिसाद 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत झाले. सकाळी ठिक 11 वाजता हे सामुहिक राष्ट्रगीत झाले.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Aug 2022 03:32 PM
जालना जिल्हाधिकारी आणि सर्वच विभागातील अधिकारी कर्मचाऱ्याच सामूहिक राष्ट्रगीत गायन

Jalna : स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवानिमित्त राज्यभर एकाच वेळी सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे ऐलान केल्यानंतर जालना येथे देखील आज सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या सह वेगवेगक्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आवर्जून हजेरी लावत सामूहिक रित्या राष्ट्रगीताचे गायन केले.

शासकीय कार्यालयातच राष्ट्रगीताचे गायन, सामान्य नागरिकांपर्यंत माहितीच पोहोचलीच नाही

Yavatmal : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व शासकीय कार्यालये, नागरिकांनी ठिक अकरा वाजून एक मिनिटांनी राष्ट्रगीत म्हणायचे, असा संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. प्रत्यक्षात राष्ट्रगीताचे गायन केवळ शासकीय कार्यालयातच करण्यात आले. सामान्य नागरिकांपर्यंत आदेशच पोहोचला नाही. त्यामुळे नागरिक राष्ट्रगीतापासून वंचित राहिल्याचे चित्र यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी उपस्थित होते.

बीडमध्ये समूह राष्ट्रगीताच्या कार्यक्रमात मुस्लिम युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समूह राष्ट्रगीताच्या कार्यक्रमात सर्वांनीच सहभाग नोंदवला होता. बीड शहरातल्या कारंजा रोडवर मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन समूह राष्ट्रगीताच गायन केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम युवक समूह राष्ट्र गायनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायन

Pune  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाअंतर्गत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सुभाष भागडे, श्रीमंत पाटोळे, रोहिणी आखाडे, स्नेहल भोसले, राणी ताठे, सुरेखा माने तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एस. व्ही. युनियन विद्यालय, सोमवार पेठ येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन केले.


विभागीय आयुक्त कार्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायन


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाअंतर्गत अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी उपआयुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, नयना बोन्दर्डे, नंदिनी आवडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्र गीतातून भारत मातेला मानवंदना

नेहमीच भाजीपालाच्या भावातील चढ उतार, शेतकरी आंदोलन, व्यापारी आडते वादामुळे चर्चेत असणारे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आज राष्ट्रगीताचे सूर कानी पडत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानंतर कृषि उत्पन्न बाजार समिती मधील अधिकारी कर्मचारी , शेतकरी व्यपारी माथाडी सारेच 11 वाजता स्तब्ध झाले. जो जिथे असेल तिथे उभा राहिला आणि भारत मातेला राष्ट्र गीतातून मानवंदना दिली. 

राष्ट्रप्रेम पहिले, नंतर अंत्यविधी, वाशिमच्या मंगरुळपीर बाहेती कुटुंबियाने दिला राष्ट्रप्रेमाचा संदेश

Washim : राष्ट्रप्रेम पहिले, नंतर धार्मिक अंत्यविधी  याची प्रचिती वाशिमच्या मंगरुळपीर शहरातील बाहेती कुटुंबियाने दाखवून दिली.  स्व. मोहीनीदेवी रामनारायण बाहेती यांचे वयाच्या 78 वर्षी  काल निधन झाले होते. आज ठरल्याप्रमाणं अंत्यसंस्कार करणार होते. आज सकाळी साडेदहा वाजता अंत्यविधी ठेवण्यात आले होते. दरम्यान, सरकारने 17 ऑगस्ट 22 ला सकाळी 11 वाजता  सामूहिक राष्ट्रगान घ्यावे असे आवाहन केले होते. राष्ट्रप्रेमी असलेल्या बाहेती परिवार व  राजस्थानी समाजाने अंत्यविधीची अंत्ययात्रा थांबवून शासनाच्या आदेशानुसार 11 वाजता राष्ट्रगीत म्हटले. यामुळं अंत्ययात्रेत असणाऱ्या नागरिकांनी आणि बाहेती परिवाराने अंत्ययात्रेतसुद्धा राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.

यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी केलं सामुहिक राष्ट्रगीताचे गायन

यवतमाळ जिल्ह्यात अमृत महोत्सव आणि  स्वराज्य महोत्सवा अंतर्गत कळंब तालुक्यातील सुकळी गावातील शेतकरी, शेतमजुर यांनी शेतात 11 वाजता सामुहिक राष्ट्रगीताचे गायन केले.

कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर परिसरात सामूहिक राष्ट्रगीताचे गायन

Kolhapur : कोल्हापूरमध्येही सामूहिक राष्ट्रगीताला चांगला प्रतिसाद मिळाला. अंबाबाई मंदिर परिसरात सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यातं आले.

अमरावतीत शेतमजुरांचे शेतातच सामूहिक राष्ट्रगाण
Amravati : अमरावती जिल्ह्यातील नया अकोला याठिकाणी सध्या शेतीचे कामं सुरु आहे. गावातील बहुतांश लोकं दिवसभर शेतात काम करताना दिसत आहेत. आज सकाळी महाराष्ट्रात सगळीकडे जिथे आहे तिथे उभं राहून राष्ट्रगीत म्हणायचं आहे असं राज्य सरकारने सांगितले होते. त्याप्रमाणं नया अकोला येथील प्रकाश साबळे या शेतकऱ्याच्या शेतात मागील दोन दिवसांपासून 25 ते 30 शेतमजूर महिला-पुरुष शेतीचं काम करत आहेत. या शेतमजुरांनी देखील सकाळी 11 वाजता एकत्र येत सामूहिक राष्ट्रगीत म्हटलं.

 
संगमनेर बसस्थानकासमोर शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांकडून सामूहिक राष्ट्रगीताचे गायन

Sangamner : संगमनेर बसस्थानकासमोर शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गात शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. 11 वाजता राष्ट्रगीताला सुरवात होताच परिसरातील सर्व व्यावसायिक, ग्राहक यांनी सहभाग घेत राष्ट्रगीताला साथ दिली. संगमनेर शहरातील सर्वच शासकीय कार्यालया बरोबरच अनेक सामाजिक संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याचं दिसून आलं. मात्र या उपक्रमाची माहिती अनेकांना नसल्यानं रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मात्र नेहमी प्रमाणेच सुरू होती.

परभणी शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांचा सामुहिक राष्ट्रगीताला चांगला प्रतिसाद





Parbhani : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 11 वाजता सर्वत्र सामूहिक राष्ट्रगीत करण्याच आवाहन केलं होतं. या आवाहनाला परभणीकरांनीही मोठा प्रतिसाद दिला. परभणी शहरासह जिल्हाभरातील शाळा महाविद्यालय विविध ठिकाणी आज अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगीत गाण्यात आलं. विविध संघटना,पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला.


 

 



 


मुलुंडमध्ये पोलिसांसह, नागरिक, सामाजिक संस्थानी केलं राष्ट्रगीताचे सामूहिक गायन

महाराष्ट्र सरकारकडून सुराज्य महोत्सव सुरु आहे. यानिमित्त आज 11 वाजता सर्व राज्यात सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. याला प्रतिसाद देत मुंबई पोलिसांच्या परिमंडळ सात चे डीसीपी प्रशांत कदम यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड मध्ये सामूहिक राष्ट्रगीत म्हटले गेले. मुलुंड पोलीस ठाण्यासमोर मुलुंड पोलीस , स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संस्था यांनी एकत्र येत राष्ट्रगीत म्हटले. या वेळी रस्त्यावरून जाणारी वाहने थांबवून ही या उपक्रमात सहभागी झाले. नागरिकांनी दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसाद बद्दल डीसीपी कदम यांनी नागरिकांचे आभार मानले.

नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातही सामूहिक राष्ट्रगीताचे गायन

Nagpur : राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातही सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. जिल्हाधिकारी आर विमला यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाले होते. शासनाच्या अशा उपक्रमातून सर्वांना एकत्रित आणले जाते. संघटित करते आणि त्यामुळे अशा उपक्रमाचे वेगळं महत्व असते असे मत जिल्हाधिकारी आर विमला यांनी व्यक्त केले. तसेच कुठलेही शासकीय कार्यालय पुन्हा एका अधिकाऱ्यामुळे किंवा कर्मचाऱ्यामुळे चालत नाही तर ते सामूहिक प्रयत्नांनी चालते. हेच या उपक्रमातून दिसून येते अशी प्रतिक्रिया ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यात समूह राष्ट्रगीत गायन, सर्व ठिकाणी देशभक्तीचा जागर

Jalgaon : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवातंर्गत जळगाव जिल्ह्यात समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम पार पडला. जिल्हयातील सर्व तालुके, सर्व गावे, सर्व शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, खाजगी संस्था अशा सर्व ठिकाणी झालेल्या या राष्ट्रगीताच्या गायनातून देशभक्तीचा जागर करण्यात आल्याचे यावेळी पहायला मिळाले. राज्यात सर्वत्र स्वराज्य महोत्सव राबविण्यात येत आहे. या महोत्सवाअंतर्गत जळगाव जिल्हयातही प्रत्येक तालुक्यात, गाव अन् गावं, सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, खाजगी संस्थांमध्ये एकाचवेळी सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताला सुरुवात झाल्याचे पहायला मिळाले, एका सुरात, शिस्तबध्द पध्दतीने राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम पार पडल्याचे पहायला मिळाले. 

पार्श्वभूमी

National Anthem Maharashtra Live Updates : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत झाले. सकाळी ठिक 11 वाजता हे सामुहिक राष्ट्रगीत झाले. यावेळी नागरिकांनी आहे त्या ठिकाणीहून उभं राहून राष्ट्रगीताचं गायन केलं. दरम्यान, यामध्ये सर्व नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं होतं. त्याप्रमाणं राज्याच्या विविध भागात राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करण्यात आलं.


यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं देशात 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या 'स्वराज्य महोत्सवाचे' आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात आली. आज सकाळी 11 वाजता राज्यात सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन झालं. या राष्ट्रगीताच्या समूह गायनामध्ये राज्यातील सर्व अबाल-वृद्धांनी सहभाग घेतला. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दरम्यान, सरकारने सर्व विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी सामूहिक राष्ट्रगीत गायन अनिवार्य केलं होतं. राष्ट्रगीतासाठी विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात एकत्र येण्यास सांगण्यात आलं होतं.


राज्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी दिली होती. सामूहिक राष्ट्रगीत गायनासंदर्भात राज्य शासनाने सविस्तर शासन निर्णय जारी केला होता. तसेच सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने यासंबंधी परिपत्रक देखील जारी करण्यात आलं होतं.
 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.