Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील सहा आरोपींची आज एसआयटी कोठडी संपणार असून सर्व आरोपींना आज बीड येथील जिल्हा न्यायालयात (Beed Court) व्हिसीद्वारे हजर केले जाणार आहे. न्यायालयाच्या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि हत्येच्या दिवशी आरोपीला संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगणारा सिद्धार्थ सोनवणे या तिघांची 14 दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. तसेच प्रतिक घुले, महेश केदार, जयराम चाटे यांची देखील 12 दिवसाची पोलीस कोठडी संपत असल्याने सर्व आरोपींना आज व्हिसीद्वारे कोर्टात हजर केले जाणार आहे. सर्व आरोपींना बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातल्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव एसआयटीकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे तलवाडा पोलीस स्टेशनमधून दोन आरोपी, गेवराई पोलीस स्टेशनमधून दोन आरोपी तर माजलगाव पोलीस स्टेशनमधून दोन आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात हजर केले जाणार आहे. आजच्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाल्मिक कराडला जेल की बेल?
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये केज जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर कराडच्या वकिलाने कोर्टामध्ये लगेच जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाला सीआयडीकडून कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले आहे. सीआयडीला संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडची चौकशी करायची असल्याने त्याला जामीन देऊ नये, अशी विनंती सीआयडीने कोर्टाकडे केली होती. याच जामीन अर्जावर आज केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराडचा जेलमधील मुक्काम वाढणार की जामीन मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या